बेळगावात केंद्रीय पथक नियुक्तीची विनंती करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:23 AM2021-03-14T04:23:39+5:302021-03-14T04:23:39+5:30
बेळगाव : कन्नड संघटनांच्या गुंडांकडून मराठी भाषिकांची दुकाने, आस्थापने आणि कार्यालयांवर हल्ले होत आहेत. पोलीसदेखील या समाजकंटकांना मदत करत ...
बेळगाव : कन्नड संघटनांच्या गुंडांकडून मराठी भाषिकांची दुकाने, आस्थापने आणि कार्यालयांवर हल्ले होत आहेत. पोलीसदेखील या समाजकंटकांना मदत करत असल्याची भावना निर्माण झाली आहे. एकंदर परिस्थिती पाहता प्रशासन जर दुटप्पेपणा, पक्षपातीपणा करत असेल तर एक केंद्रीय पथक बेळगावातील मराठी माणसांसाठी नेमावे, अशी विनंती आम्ही पंतप्रधानांकडे करणार आहोत, अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी दिली.
कन्नड संघटनांच्या गुंडांकडून कन्नड सक्तीसाठी मराठी भाषिकांची दुकाने, आस्थापने आणि कार्यालयांवर हल्ले होत आहेत. तेव्हा या समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करून कायदेशीर कारवाई करावी. जर का हे प्रकार असेच सुरू राहिल्यास तीव्र आंदोलन छेडू आणि वेळ आल्यास न्यायालयीन लढादेखील देऊ, असा इशारा देणारे निवेदन शनिवारी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन यांना सादर करण्यात आले. निवेदन देताना उपाध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सूरज कुडूचकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, समन्वयक अरविंद नागनुरी, रणजित चव्हाण-पाटील, आर. आय. पाटील, आदी उपस्थित होते.
फोटो- १३ बेळगाव पोलीस निवेदन
बेळगाव येथे केंद्रीय पथकाच्या नेमणुकीसाठी पोलीस आयुक्तांशी चर्चा करताना मराठी भाषिक.