गगनबावडा मार्गाचे लवकरच काँक्रिटीकरण

By admin | Published: October 2, 2016 12:50 AM2016-10-02T00:50:18+5:302016-10-02T00:50:18+5:30

सर्वेक्षणाला चार दिवसांत प्रारंभ : कोल्हापूर-तळेरे ९९ कि.मी.चे रुंदीकरण

Centralization of Gaganbavada road soon | गगनबावडा मार्गाचे लवकरच काँक्रिटीकरण

गगनबावडा मार्गाचे लवकरच काँक्रिटीकरण

Next

तानाजी पोवार, कोल्हापूर : कोल्हापूर ते तळेरे या गगनबावडामार्गे कोकणाला जोडणाऱ्या राज्य महामार्गाच्या रुंदीकरण प्रकल्पाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला. या सुमारे ९९ किलोमीटर अंतराच्या महामार्गाचे सर्र्वेक्षण करण्याचे काम मुंबईतील एईकॉन कंपनीला देण्यात आले आहे. येत्या चार दिवसांत या कंपनीमार्फत मार्गाच्या सर्वेक्षणचे काम सुरू करण्यात येणार आहे. हा मार्ग मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार असून, तो संपूर्णपणे सिमेंट-काँक्रीटचा करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाचे रुंदीकरण करण्याच्या कामाला पुष्टी मिळणार आहे. हे सर्वेक्षण सहा महिन्यांत पूर्ण करून पाठोपाठ कामालाही प्रारंभ करण्यात येणार आहे.
कोल्हापूरमार्गे कोकणात गोव्याकडे जाण्यासाठी आंबोली, राधानगरी आणि गगनबावडा या तीन मार्गांवरून वाहतूक होते; पण कोकणात अथवा गोव्याकडे जाण्यासाठी कोल्हापूर-गगनबावडा-तळेरे या मार्गाचा अवलंब वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात होतो; तसेच तो सोयीचाही मागला जातो. त्यामुळे कोल्हापूर ते गगनबावडामार्गे तळेरेपर्यंत व मुंबई ते गोवा राज्य महामार्गापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. या मार्गावरील वाहतुकीचा भार पाहता, या मार्गाचे रुंदीकरण करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. वाहतुकीचे वाढते प्रमाण पाहता रस्ता अपुरा पडत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या मार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या अडचणी लक्षात घेता, आहे त्याच मार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. या रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी सल्लागार म्हणून मुंबईच्या एईकॉन कंपनीची निवड केली आहे. या कंपनीमार्फत येत्या चार दिवसांत सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
दुर्घटना टाळण्यासाठी...
कोपार्डेपासून कोकणापर्यंत नेहमीच मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे रस्त्यांची खडी उखडून रस्ते खराब होतात. त्यामुळे वाहने घसरून अनेक दुर्घटना घडल्या आहेत. यामुळे रस्त्याचा दर्जा सुस्थितीत राहावा, पावसाचाही त्याच्यावर परिणाम होऊ नये म्हणून तळेरेपर्यंतचा सर्व रस्ता हा काँक्रीटचा होणार आहे.
भूसंपादनात अडचण नाही
सध्याचा रस्ता हा साडेपाच मीटर रुंदीचा आहे. त्याचे रुंदीकरण करताना तो सुमारे १० मीटर रुंद होणार आहे. रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्यात विशेष अडचणी येणार नाही. या रस्त्याच्या दोन्हीही बाजूंना मोठ्या प्रमाणात जागा सोडून विकास झालेला आहे. काही मोजक्याच ठिकाणी असणाऱ्या अडचणी तडजोडीने सोडविता येणार आहेत.
मार्गावर पूल नाही
संपूर्ण मार्गावर कोठेही पूल असणार नाहीत. काही ठिकाणी पाणी रस्त्याखालून जाण्यासाठी मोरीची लहान-मोठी कामे असणार आहेत.
रस्ता दहा मीटर रुंद होणार
कोल्हापूर-गगनबावडा-तळेरे हा ९९ किलोमीटरचा रस्ता बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. तेथून पुढे हा रस्ता मुंबई ते गोवा मार्गाला जोडण्यात येणार आहे. सध्या हा मार्ग अवघा ५.५ मीटर रुंद असून, त्याचे सुमारे १० मीटरपर्यंत रुंदीकरण होणार आहे. त्यामुळे अवजड वाहनांनाही तो वाहतुकीस सोयीस्कर होईल.
यांचेही रुंदीकरण
वेंगुर्ला ते मठ, बोर्डी, अंबोली, चंदगडमार्गे बेळगाव या मार्गाचेही रुंदीकरण दहा मीटरपर्यंत करण्यात येणार आहे. याशिवाय रेड्डी, सावंतवाडी, अंबोली, आजरा, गडहिंग्लजमार्गे संकेश्वर या मार्गांचेही रुंदीकरणाला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे.

 

Web Title: Centralization of Gaganbavada road soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.