शाहूवाडीत कोरोना बळीचे शतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:27 AM2021-09-04T04:27:35+5:302021-09-04T04:27:35+5:30
अनिल पाटील सरूड : लोकमत न्यूज नेटवर्क शाहूवाडी तालुक्यात दुसऱ्या लाटेतील कोरोना बाधित रुग्णसंख्येने ४ हजारचा आकडा ओलंडला ...
अनिल पाटील
सरूड : लोकमत न्यूज नेटवर्क
शाहूवाडी तालुक्यात दुसऱ्या लाटेतील कोरोना बाधित रुग्णसंख्येने ४ हजारचा आकडा ओलंडला असून दुसऱ्या लाटेत तालुक्यातील १०३ कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक दिसून येत आहे. पहिल्या लाटेत १३५८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते, तर ५१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. सध्या तालुक्यातील २१ गावांत ४९ कोरोनाबाधित रुग्ण सक्रिय आहेत.
शाहूवाडी तालुक्यात एप्रिल, मे व जून, जुलै या चार महिन्यांत कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा मोठा उद्रेक झाला. या काळात प्रशासकीय यंत्रणेने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून रुग्णसंख्या व मृत्यूदर कमी करण्याच्या दृष्टीने शर्थीचे प्रयत्न केले. पंरतु नागरिकांची बेफिकिरी व प्रशासनाच्या सूचनांकडे केलेल्या दुर्लक्षपणामुळे प्रशासनाला रुग्णसंख्या आटोक्यात आणताना नाकीनऊ आले. अद्यापही तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका टळलेला दिसत नाही. दुसऱ्या लाटेत २ सप्टेंबर अखेर तालुक्यात ४०५० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ३८९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून १०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४९ रुग्ण उपचार घेत आहेत.
कोट...
शाहूवाडी तालुक्यात कोरोना बाधितांची सक्रिय रुग्णसंख्या कमी झाली असली तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्याने आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क असून, येणाऱ्या गणेशोत्सव काळात नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे व नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
डॉ. एच. आर. निरकांरी, तालुका आरोग्य अधिकारी, शाहूवाडी