मौजीबंधन संस्कार विधीस प्रतिसाद

By admin | Published: February 1, 2015 11:59 PM2015-02-01T23:59:00+5:302015-02-02T00:10:10+5:30

१८३ बालकांचा सहभाग : धार्मिक मंत्रोच्चार, धर्मोपदेश

Ceremonial Rite | मौजीबंधन संस्कार विधीस प्रतिसाद

मौजीबंधन संस्कार विधीस प्रतिसाद

Next

बाहुबली : बाल्यावस्थेमध्ये झालेले उत्तम संस्कार हे मनुष्यास जीवन जगण्यास उपयोगी पडतात. त्याला
जैन धर्मामध्ये अगदी प्राचीन काळापासून महत्त्व आहे. त्याचाच एक भाग म्हणजे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्त घेण्यात आलेला मौजीबंधन संस्कार विधी. या मौजीबंधन विधीसाठी कुमारावस्थेतील १८३ बालकांनी सहभाग घेतला. यावेळी धार्मिक मंत्रोच्चार व धर्मोपदेश देऊन बालकांवर संस्कार विधी करण्यात आला.जैन श्रावक बनण्यास आवश्यक असलेल्या मौजीबंधन संस्कार विधीमध्ये रात्री भोजन त्याग करणे, रोज देवदर्शन करणे, व्यसनांचा त्याग करणे, गुरूंचा विनय करणे, सेवाभाव अंगी ठेवणे, आई-वडिलांचा मान राखणे, लग्नापर्यंत ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणे आदी उपदेशामृत देण्यात आले. हा संस्कार सोहळा समर्पणसागर महाराजांच्या निर्देशनाखाली प्रतिष्ठाचार्य सुशीलकुमार उपाध्ये, सहप्रतिष्ठाचार्य महावीर शास्त्री, युवा प्रतिष्ठाचार्य पं. सम्मेद उपाध्ये यांनी केला.यावेळी आचार्य वर्धमानसागर महाराज, आर्थिका ज्ञानमती माताजी, गुरूकुलमाता गजाबेन, विश्वस्त समिती अध्यक्ष अरविंद दोशी, पाटील, सुधाकर मणेर आदी मान्यवर व वीर सेवा दल उपस्थित होते.
दरम्यान, मस्तकाभिषेकच्या तिसऱ्या दिवशी महामूर्तीचा चरणाभिषेक श्री. व सौ. सरोज सुधाकर मणेरे यांच्या हस्ते करण्यात आला. चौबीस तीर्थंकर विधानाच्यावेळी ध्वजारोहण टीकमचंद पाटणी यांनी केले, तर विधानमंडप उद्घाटन बाबासाहेब पाटील (कुंभोज) व मंगलकलश स्थापना बाळासाहेब पाटील यांनी केले.
दुपारी गुरुदेव समंतभद्र विनयांजली सभा झाली. त्यामध्ये प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांचे गुरुदेवश्री समंतभद्र महाराज यांचे गुरुकुल परंपरा या विषयावर व्याख्यान झाले.
अनेक धार्मिक कार्यक्रमांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यावेळी राजेंद्र गांधी, महावीर पाटील, ब्र. श्रीधर मगदूम, बी. टी. बेडगे, सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील, शांतीनाथ कांते, डॉ. विजयराज मगदूम, अण्णासाहेब शेंडुरे आदी उपस्थित होेते. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

गर्दीचा उच्चांक
रविवार सुटीचा दिवस असल्याने जैन-जैनेतर बांधवांनी गर्दी केल्याने तिसऱ्या दिवशीच गर्दीने उच्चांक गाठला. पूजा विधानांसह मौजीबंधन संस्कारामध्ये भाविकांनी गर्दी केली.
आजचे कार्यक्रम
चौसष्ठ ऋद्धी विधान
महामस्तकाभिषेक
धार्मिक पोवाडा व नाटिका

Web Title: Ceremonial Rite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.