लस घेतली असेल तरच दाखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:22 AM2021-04-11T04:22:31+5:302021-04-11T04:22:31+5:30
शिये : कोरोना प्रतिबंधक लसीबाबत जनतेत उदासिनता असल्याने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी ...
शिये : कोरोना प्रतिबंधक लसीबाबत जनतेत उदासिनता असल्याने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी शिये ग्रामपंचायतीने ‘नो वॅक्सिन, नो दाखला’ धोरण राबविण्याचे ठरविले आहे. जे पात्र नागरिक लस घेणार नाहीत त्यांना ग्रामपंचायतीमधून कोणत्याही प्रकारचा दाखला देण्यात येणार नाही, असा निर्णयच ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या दक्षता समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच रेखा जाधव होत्या.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी आणि लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी शियेतील दक्षता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गावात कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आशा सेविकांमार्फत घरोघरी रूग्ण सर्वेक्षण करण्यात येणार असून सामाजिक संस्थांच्या समन्वयातून परगावाहून आलेल्या लोकांना अलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.
यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी राखी शिंदे यांनी लसीकरणाबाबत माहिती दिली व गावात शंभर टक्के लसीकरण यशस्वी करण्याचे आवाहन केले. या बैठकीस उपसरपंच शिवाजी गाडवे, जयसिंग पाटील, विलास जाधव, शिवाजी बुवा, रणजीत कदम, जयसिंग काशिद, सतीश कुरणे, संदीप पाटील, नंदकिशोर कोळी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.