सेस वसुली होणारच : समिती पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना सुनावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 05:21 PM2019-07-18T17:21:59+5:302019-07-18T17:26:27+5:30
कोल्हापूर : सेस आकारणी ही बाजार समिती आपल्या मर्जीने करीत नाही. शासनानेच ठरवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी म्हणून वसुली करण्याचे ...
कोल्हापूर : सेस आकारणी ही बाजार समिती आपल्या मर्जीने करीत नाही. शासनानेच ठरवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी म्हणून वसुली करण्याचे काम करते. ते नको असेल तर खुशाल सरकारकडे जाऊन नियम बदलून आणा, अशा शब्दांत बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना सुनावले. धान्य बाजार स्थलांतरणावरूनही संचालकांनी व्यापाऱ्यांचे चांगलेच कान टोचले. ‘एक पाय टाकलाच आहे, आता उरलेला पायही आत टाका, स्वागतासाठी समिती सज्ज आहे,’ असा चिमटाही काढला.
शुक्रवारी दुपारी मल्टिपर्पज सभागृहात सभापती बाबासो लाड यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची १६वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. पुढील वर्षी जुलैमध्ये निवडणुका होणार असल्याने नियमानुसार ही शेवटचीच सभा ठरत असल्याने सभेत कारभारावर झोड उठण्याऐवजी विद्यमान संचालकांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव झाला.
सचिव मोहन सालपे यांनी अहवालाचे वाचन केल्यानंतर सभेच्या कामकाजास सुरुवात झाली. माजी संचालक नयन प्रसादे यांच्यासह प्रदीप कापडिया, अशोक आहुजा यांनी व्यापाऱ्यांना सेसमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी केली. यावर सभापती लाड, माजी सभापती कृष्णात पाटील यांनी जोरदार आक्षेप घेतला.
दरम्यान, सभेत बोलण्यावरून शासननियुक्त संचालक अॅड. किरण पाटील व विलास साठे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. संचालक म्हणून बोलता येत नाही, तशी परवानगी देऊ नये असे नंदकुमार वळंजू यांनी सांगितले.
पाटील यांनीही बोलता येत नसेल तर मी राजीनामाच देतो, असा इशारा दिल्यानंतर त्यांना बोलू दिले गेले; पण त्यांनी कोणताही विषय न मांडता केवळ जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.