‘चाय पे चर्चा’ अन् प्रचाराचा धडाका !
By admin | Published: February 17, 2017 11:48 PM2017-02-17T23:48:01+5:302017-02-17T23:48:01+5:30
कोपर्डे हवेलीतील चित्र : सर्व पक्षीय कार्यकर्ते जमतात एकाच ठिकाणी
कोपर्डे हवेली : येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील सर्वच उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मात्र, प्रचाराला जाण्यापूर्वी संबंधित सर्वच पक्षाचे कार्यकर्ते एकाच ठिकाणी थांबून ‘चाय पे चर्चा’ करताना दिसत आहेत.
सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा धुरळा उडत आहे. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभांसह गावोगावी जाऊन घरोघरी मतदारांची भेट आहे. तर कोपर्डे हवेली येथे सर्व पक्षीय कार्यकर्ते गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी चर्चांचा फड रंगवत आहेत. कोपर्डे हवेली हे राजकीयदृष्ट्या जागृत गाव म्हणून ओळखले जाते.
कऱ्हाड तालुक्यातील उत्तरेतील गटात सर्वात जास्त मतदारांची संख्या असणारे गाव म्हणजे कोपर्डे हवेली. राजकारणातील अनेक महत्त्वाची पदे या गावातील स्थानिक नेत्यांना मिळाली आहेत. गावात दोन गटही तेवढ्याच ताकदीचे असल्याने निवडणुकीच्या दरम्यान आजपर्यंत कोणीही टोकाचे राजकारण कधीच केले नाही. राजकारणाच्या पलीकडे आपापले हितसंबंध जोपासत निवडणुकीला सामोरे जायचे, अशी शिकवण जुन्या पिढीतील लोकांनी दिली आहे.
याच पावलावर पाऊल ठेवून गावातील तरुण वर्गही राजकारणात उतरला आहे.
निवडणुकीमुळे गावातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या दिवसभराच्या दिनक्रमातही चांगलाच बदल झाला आहे. सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत ते प्रचार रॅलीत सहभागी होत आहेत. तसेच त्यानंतर रात्रीपर्यंत आपल्या उमेदवारांसह जाहीर सभांना उपस्थिती लावत आहेत.
राष्ट्रीय काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस आणि भाजप अशीच लक्षवेधी लढत कोपर्डे हवेली गटात पाहायला मिळणार आहे. कोपर्डे हवेली गावातून एकूण तीन उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद गटासाठी एक आणि पंचायत समिती गणासाठी दोन आहेत. पक्षांचे कार्यकर्ते जरी गावातील पारावर आणि हॉटेलमध्ये बसून गप्पा मारत चहा एकत्रित घेत असले तरी आपापल्या पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी निष्ठेने काम करत आहेत.
या गटात आणि गणात ‘काँटे की टक्कर’ असताना गावातील हे खेळीमेळीचे चित्र पाहून परिसरातील गावातील लोकांमधूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, तरी सुद्धा कोण जिंकणार आणि कोण हरणार, याविषयी गावात पैजा लागल्याचे ऐकायला मिळत आहे. ज्येष्ठांकडून कौल विचारला जात आहे. (वार्ताहर)
लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात. निकोप वातावरणात त्या शांततेत पार पडल्या पाहिजेत. तेच वातावरण आमच्या गावात पाहायला मिळत आहे. आम्ही सर्व पक्षीय कार्यकर्ते आपापल्या पक्षाचा निष्ठेने प्रचार करत आहे. प्रचाराला जाण्यापूर्वी गावातील मध्यवर्ती ठिकाणी एकत्रित येऊन चहा घेतल्यानंतर प्रचाराला सुरुवात करीत आहे.
- भरत चव्हाण, कार्यकर्ता
सकाळी गृहभेटी, दुपारी वामकुक्षी तर रात्री प्रचार सभा
एरवी गावातील पक्षांचे ‘निष्ठावंत’ कार्यकर्ते आपापल्या कामात मग्न असतात. मात्र, सध्या निवडणुकीमुळे हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. ग्रामस्थांच्या दिनक्रमातही बदल झाले असून, सकाळी उमेदवारांबरोबर मतदारांच्या गृहभेटी घेणे, दुपारी जेवण करून वामकुक्षी घेणे तर रात्री पुन्हा प्रचार रॅली व जाहीर सभांना हजेरी लावणे असा दिनक्रम झाला आहे.