मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात उपोषणाऐवजी १ जानेवारीपर्यंत साखळी धरणे आंदोलन

By संदीप आडनाईक | Published: November 3, 2023 04:27 PM2023-11-03T16:27:53+5:302023-11-03T16:53:53+5:30

गावागावांत चावडीसमोर तासभर आंदोलन करण्याचे आवाहन

Chain dharna movement till January 1 instead of hunger strike in Kolhapur for Maratha reservation | मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात उपोषणाऐवजी १ जानेवारीपर्यंत साखळी धरणे आंदोलन

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात उपोषणाऐवजी १ जानेवारीपर्यंत साखळी धरणे आंदोलन

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने २ जानेवारीपर्यंतचा वेळ दिला असला तरी पूर्वानुभव लक्षात घेता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा अल्टीमेटम पुढे वाढवू शकतात. म्हणून संपूर्ण मराठा आरक्षण मिळण्यासाठी आणि मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर सकल मराठा समाज साखळी उपोषणाऐवजी दसरा चौकात आज, शनिवारपासून रोज सकाळी ११ ते १२ या वेळेत साखळी धरणे आंदोलन करणार असल्याची घोषणा शुक्रवारी मराठा नेत्यांनी केली. शिवाय गावागावात चावडीसमोर एक तास धरणे आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.

दसरा चौकात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या रविवारपासून सुरु असलेल्या सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाची शुक्रवारी सांगता झाली. यानंतर समन्वय समितीच्या बैठकीत १ जानेवारीपर्यंत साखळी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय झाला. यापुढील आंदोलनाची दिशा समन्वयक वसंतराव मुळीक, ॲड. बाबा इंदूलकर, दिलिप देसाई, बाबा पार्टे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

वसंतराव मुळीक म्हणाले, मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांना राज्य सरकारने २ जानेवारीपर्यंत आरक्षण देण्याबाबत जे काही करता येईल ते करण्याचे मान्य केले आहे. राज्यातील ४ कोटी मराठा त्यांच्या पाठीशी आहे. यापूर्वी दोनवेळा मराठ्यांची फसवणूक झाली आहे. तिसऱ्यांदा फसवल्यास सरकारला परिणाम भोगावे लागतील.

ॲड. इंदुलकर म्हणाले, लोकसभेची आचारसंहिता लागल्यास मराठा आरक्षण हे स्वप्नच राहण्याची भिती आहे. त्यामुळे राज्य घटनेतील कलम ९ आणि ११ ची अंमलबजावणी करुन आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आणि जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरात रोज एक तास साखळी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी माजी महापौर आर. के. पोवार, अनिल घाटगे, जयेश कदम, शारंगधर देशमुख, मधुकर रामाणे, अमर निंबाळकर, किरण पडवळ, हिदायत मणेर आदी उपस्थित होते.

Web Title: Chain dharna movement till January 1 instead of hunger strike in Kolhapur for Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.