ठोस निर्णय न घेतल्याने सीपीआरच्या पारिचारिकांचे साखळी उपोषण कायम

By संदीप आडनाईक | Published: January 4, 2024 07:33 PM2024-01-04T19:33:25+5:302024-01-04T19:33:31+5:30

निर्णय न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा

Chain hunger strike of CPR nurses continues due to lack of concrete decision | ठोस निर्णय न घेतल्याने सीपीआरच्या पारिचारिकांचे साखळी उपोषण कायम

ठोस निर्णय न घेतल्याने सीपीआरच्या पारिचारिकांचे साखळी उपोषण कायम

कोल्हापूर : आरोग्य सेवेचा कणाअसलेल्या परिचर्या संवर्गातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सीपीआरच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर साखळी उपोषण केले. अधिष्ठातांनी बैठकीचे लेखी इतिवृत्त सादर केले, मात्र मागण्यांबाबत कोणताही ठोस निर्णय न दिल्याने साखळी उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार महाराष्ट्र गर्व्हर्मेंट नर्सेस असोसिएशनने केला. यावेळी पारिचारिकांनी घोषणा देत निदर्शने केली. असोसिएशनने निर्णय न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाचे (सीपीआर) एनएएबीएच मानांकन करुन घ्यावे, एमसीआयची सर्व मानांकने तंतोतंत पाळावीत, मानांकनाप्रमाणे ११०० परिचर्या आवश्यक असताना केवळ ५०० संवर्गावर काम चालते, किमान ४०० नवीन परिचर्या संवर्गाची पदनिर्मिती तत्काळ करावी,रिक्त पदे तातडीने भरावीत, पदनाम केंद्र सरकारप्रमाणे बदलून मिळावे, महिला संवर्गासाठी पाळणाघर सुरु करावे, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तसेच परिचर्या संवर्गाची अधिसेविका पदे तातडीने भरावीत, अधिसेविका कार्यालयामार्फतचे पॉकेट रुल बंद करावेत, परिचर्यांची आर्थिक देयके फरकासहित आणि व्याजासहित मिळावीत, एमएस्सी, बीएस्सी, नर्सिंग शासकीय महाविद्यालये करण्यात यावीत, सीपीआर मधील परिचर्या महाविद्याालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करावे, रुग्णालयात औषधे आणि साधनसामग्रीचा मुबलक पुरवठा करावा, परिचारिकांना अन्य कामे लाउ नयेत अशा विविध मागण्या महाराष्ट्र गर्व्हमेंट नर्सेस असोसिएशनने जिल्हाधिकारी आणि अधिष्ठाता यांच्याकडे केल्या आहेत. या आंदोलनात अध्यक्ष हशमत हावेरी, संजीवनी दळवी, मनोज चव्हाण, संतोष गडदे, कैश कागदी, पूजा शिंदे, श्रीमंती पाटील, सरोज शिंदे सहभागी झाले.

Web Title: Chain hunger strike of CPR nurses continues due to lack of concrete decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.