धर्मनिरपेक्ष संघटनांची साखळी करा

By admin | Published: May 26, 2015 12:27 AM2015-05-26T00:27:38+5:302015-05-26T00:56:18+5:30

हेमंत देसाई : पहिला मुस्लिम समाजप्रबोधन पुरस्कार जोगासिंग घुमान यांना प्रदान

Chain secular organizations | धर्मनिरपेक्ष संघटनांची साखळी करा

धर्मनिरपेक्ष संघटनांची साखळी करा

Next

कोल्हापूर : धर्मांध शक्तींचे बळ कमी करायचे असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. धर्मनिरपेक्षतेचे काम करणाऱ्या संघटना, संस्थांची साखळी निर्माण झाल्यास देशाचा खरा विकास होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी केले.
मुस्लिम समाजप्रबोधन शिक्षण संस्थेच्यावतीने सोमवारी शाहू स्मारक भवनात पंजाबमध्ये सरवरपुरात स्वखर्चाने मस्जिद बांधणाऱ्या जोगासिंग घुमान यांना पहिला मुस्लिम समाजप्रबोधन पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. रोख २१ हजार, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
देसाई म्हणाले, पंजाबच्या एका कोपऱ्यात स्वातंत्र्यानंतर हिंदू-मुस्लिम दंगलीत पाडलेली मस्जिद ६३ वर्षांनंतर स्वखर्चाने बांधून देणारे जोगासिंग यांचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. आज धर्मनिरपेक्षता हा शब्द जरी उच्चारला, तरी खिल्ली उडविणारे अनेक राजकारणी आहेत. देशाची आजची प्रगती केवळ पंडित नेहरू यांच्या दूरदृष्टीचे फळ म्हणावे लागेल. स्वातंत्र्यानंतर देशात गरिबी होती. त्यामुळे हिंदू-मुस्लिम दंगली पसरण्याचे दिवस होते. एका बाजूला सद्भाव व बंधुभाव टिकविण्याचे महत्त्वाचे काम, तर दुसऱ्या बाजूला देशात सिमेंट, लोखंड, धरणे, उद्योग उभे करण्याचे मोठे काम होते. त्याच काळात कडवे हिंदुत्ववादी नेतृत्व असते, तर देशाची शकले झाली असती. आजच्या काळात जोगासिंग यांच्यासारखी माणसे दैनंदिन जीवनाचे महत्त्व जाणून आहेत.
जोगासिंग म्हणाले, तुम्ही माझा अपेक्षेपेक्षा मोठा सत्कार केला. मला दिलेल्या पुरस्कार रकमेतील सात हजार वारांगणांच्या मुलांसाठी, उर्वरित प्रत्येकी सात हजार अनुक्रमे रुग्णालयास व एका विद्यालयासाठी द्यावेत. कणेरीतील शंभर वर्षांपूर्वीची मस्जिद आपण सर्वांनी बांधून द्यावी. त्यासाठी मीसुद्धा मदत देईन.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, तुमचा सत्कार आम्ही नाही, तर राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांनी केला. महाराजांनी त्याकाळी धर्म घरातच ठेवा. बाहेर पडल्यानंतर तुम्ही केवळ हिंदी आहात, अशी शिकवण दिली.
हुसेन जमादार म्हणाले, महमद गौस नाईक, प्रा. फ. म. शहाजिंदे, दिलावर जमादार, गुलाब वळसंगकर, मरियमबी जमादार व मी सरवरपूरला गेलो होतो. जोगासिंग यांचे काम पाहिल्यामुळे त्यांचा गौरव करणे क्रमप्राप्त वाटले.
यावेळी पंजाबचे गुरुप्रीतसिंग, एम. ए. नाईक, आय. एन. बेग, गाझिउद्दीन सलाती, गणी पटेल, व्यंकाप्पा भोसले, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)



पानसरेंची आठवण...
ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी या सभागृहात धर्मनिरपेक्षता म्हटले की, ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची आठवण आल्याशिवाय राहत नसल्याचे सांगत आपल्या भाषणाची सुरुवात केली.


राजर्षी शाहू यांच्या चरित्रग्रंथाची भेट
जोगासिंग घुमान यांना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी ‘राजर्षी शाहू चरित्रग्रंथ’ भेट दिला, तर निपाणी येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या गणी पटेल यांनीही जोगासिंग यांचा गौरव केला.

Web Title: Chain secular organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.