सभापती, नगरसेवकांत धक्काबुक्की
By admin | Published: June 16, 2015 01:03 AM2015-06-16T01:03:05+5:302015-06-16T01:14:34+5:30
इचलकरंजी नगरपालिकेतील प्रकार : दोघांच्या समर्थकांमध्ये झालेल्या रेटारेटीत काच फुटली
इचलकरंजी : नगरपालिकेचे बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे व नगरसेवक मोहन कुंभार यांच्यात मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्येच शिवीगाळ व धक्काबुक्की झाली. यावेळी दोन्ही बाजूच्या समर्थकांकडून परस्परांना रेटारेटी केल्यामुळे दालनातील पार्टीशनची काच फुटली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नगरसेवक व पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. नगरसेवक संतोष शेळके यांनी पालिकेवर काढलेल्या मोर्चावेळी झालेल्या चर्चेमध्येच हा प्रकार घडला.
प्रभागातील रस्ते आणि अस्वच्छता यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी नगरसेवक शेळके, तमन्ना कोटगी व रवी लोहार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी नगरपालिकेवर मोर्चा काढला होता. याबाबत मुख्याधिकारी सुनील पवार यांच्यासमोर प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नसल्यामुळे नगरसेवक शेळके यांनी जोरदार संताप व्यक्त केला.
तेव्हा साडेपाच कोटी रुपयांची मंजूर असलेली गटारींची कामे का होत नाहीत, असा प्रश्न नगरसेवक शेळके यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्याधिकारी पवार यांनी सांगितले, या कामांबाबत तक्रारी झाल्या. मात्र, आता ही कामे मार्गी लागली असून, मक्तेदारांना वर्क आॅर्डर देण्याचे काम सुरू आहे, अशी चर्चा सुरू असतानाच नगरसेवक मोहन कुंभार तेथे आले. त्यांनी कुडचे मळा व बाळनगर परिसरातील गटारींची कामे मंजुरीसाठी का घेतली नाहीत, अशी विचारणा मुख्याधिकाऱ्यांना केली. तेव्हा गटार बांधकामाबाबत कुणी तक्रार केली, अशी विचारणा आंदोलनकर्त्या नागरिकांतून करण्यात आली. यावर मुख्याधिकारी पवार खुलासा देताना म्हणाले, नगरसेवक विठ्ठल चोपडे, माजी नगरसेवक दीपक ढेरे व त्यानंतर मोहन कुंभार यांनी तक्रारी केल्या आहेत.
मुख्याधिकारी यांनी नावे सांगताच बांधकाम सभापती आवळे यांनी चर्चेमध्ये हस्तक्षेप केला. आणि आवळे व कुंभार यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. दोघांमधील आरोप-प्रत्यारोप वाढत गेले. तेव्हा तेथे असलेल्या काहीजणांनी कुंभार यांना मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. असा गोंधळ सुरू असताना कुंभार यांच्याबरोबर आलेल्या एका समर्थकाने ‘सगळे चोर आहेत’, असे विधान केले. त्यामुळे संतप्त झालेल्या आवळे यांनी, ‘कुणाला चोर म्हणता?’, असा जाब विचारत ते कुंभार यांच्या अंगावर गेले. आणि दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली.मुख्याधिकाऱ्यांच्या दालनालगत असलेल्या अॅन्टी चेंबरर्सचे पार्टीशन जोरजोराने हलू लागले आणि पार्टीशनची काच फुटली. ही काच लिपीक गणेश शिंदे यांच्या अंगावर पडली; पण सुदैवाने फक्त शर्ट फाटला, जखम झाली नाही. हा प्रकार सुरू असतानाच नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यासुद्धा तेथे उपस्थित होत्या. उपस्थित नगरसेवक महादेव गौड, मदन झोरे, सयाजी चव्हाण, आदींसह पोलिसांनी हस्तक्षेप करीत हा वाद मिटविला. (प्रतिनिधी)
स्वच्छतेचे आश्वासन
मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामधील चर्चेवेळी प्रभाग क्रमांक तेरामध्ये साचलेला कचरा व तेथील अस्वच्छता यांची पाहणी मुख्याधिकारी पवार हे मंगळवारी प्रत्यक्ष करणार असल्याचे सांगण्यात आले. या पाहणीनंतर तेथील नियमितपणे होणारी सफाई व स्वच्छतेचे नियोजन केले जाणार आहे, अशीही ग्वाही यावेळी देण्यात आली.