दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा, पुर्वसंध्येला भाविकांची अलोट गर्दी; पहाटेपासून धार्मिक विधी

By इंदुमती सूर्यवंशी | Published: April 22, 2024 09:11 PM2024-04-22T21:11:34+5:302024-04-22T21:11:50+5:30

जिल्हा प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे.

Chaitra Yatra of Sri Jotiba, King of Deccan, huge crowd of devotees on eve; Rituals from dawn | दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा, पुर्वसंध्येला भाविकांची अलोट गर्दी; पहाटेपासून धार्मिक विधी

दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा, पुर्वसंध्येला भाविकांची अलोट गर्दी; पहाटेपासून धार्मिक विधी

कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची वर्षातील सर्वात मोठी चैत्र यात्रा आज मंगळवारी होत आहे. यानिमित्ताने पहाटेपासून धार्मिक विधी होणार असून यात्रेच्या पूर्वसंध्येला डोंगरावर लाखो भाविक सासनकाठ्यांसह दाखल झाले आहेत, डोंगर गुलालात न्हाऊन निघाले आहे. जिल्हा प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे.

मंदिरात आज पहाटे तीन पासून धार्मिक विधी सुरू होतील. पाच वाजता शासकीय महाभिषेक, महापूजा, सकाळी १० वाजता धुपारती सोहळा होईल. दरवर्षी पालकमंत्र्यांच्या हस्ते सासनकाठ्यांच्या पूजनाने मिरवणूक सुरू होते. यंदा लोकसभा आचारसंहितेमुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता सासनकाठ्यांचे पूजन होईल. म्हालदार चोपदार यांच्या तोफेच्या सलामीने मिरवणुकीला प्रारंभ होईल. पहिला मान इनाम पाडळी (जि. सातारा) येथील सासनकाठीचा आहे. सायंकाळी साडेपाच वाजता तोफेच्या सलामीने जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे पालखी मार्गस्थ होईल .सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात यमाईदेवी व जमदग्नी यांच्या विवाह सोहळा होईल. त्यानंतर पालखी श्री जोतिबा मंदिरात परत येईल. रात्री दहा वाजता पालखी सोहळ्याची सांगता होईल.

यात्रेनिमित्त गेल्या चार दिवसांपासूनच मानाच्या सासनकाठया जोतिबा डोंगरावर दाखल झाल्या आहेत. चांगभलंच्या गजराने डोंगर दुमदुमून गेला आहे .डोंगर वाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. भाविक बैलगाडी, खाजगी वाहनातून, तसेच पायीदेखील जोतिबा डोंगरावर आले आहेत. यंदाच्या यात्रेला ज्यादा भाविक येतील असा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.

यात्रेवर सीसीटिव्हीचा वॉच असणार आहे. दोन ठिकाणी आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. डोंगराच्या पायथ्याशी पार्किंगची व्यवस्था आहे. भाविकांच्या सोयीसाठी स्वयंसेवी संस्थांकडून अन्नछत्र, आरोग्य उपचार केंद्राची करण्यात आली आहे. कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 

Web Title: Chaitra Yatra of Sri Jotiba, King of Deccan, huge crowd of devotees on eve; Rituals from dawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.