राजारामपुरीतील चाकूहल्ला प्रेम प्रकरणातून
By admin | Published: May 8, 2017 06:05 PM2017-05-08T18:05:00+5:302017-05-08T18:05:00+5:30
संशयिताची कबुली, संशयित तरुण ताब्यात
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0८ : राजारामपुरी, तिसऱ्या गल्लीमध्ये आकाश सुरेश दिंडे (वय २०, रा. राजारामपुरी, १४ वी गल्ली) या तरुणावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले. अनिकेत महादेव हेडगे (रा. मातंग वसाहत, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.प्रेम प्रकरणातून हल्ला केल्याची कबुली हेडगे याने दिल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले.
याबाबतची अधिक माहिती अशी, आकाश दिंडे हा राजारामपुरी, तिसऱ्या गल्लीतील एका सराफ दुकानात कामास आहे. शनिवारी (दि. ६ मे) त्याच्यावर चाकू हल्ला झाल्याने तो जखमी झाला. त्याने तिघा अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दिंडे व हेडगे यांच्यात झटापट होताना दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही विश्वासात घेऊन चौकशी केली असता दोघेही राजारामपुरी येथील एका क्लासमध्ये येणाऱ्या युवतीवर एकतर्फी प्रेम करतात.
दरम्यान, हेडगे हा त्या युवतीच्या क्लाससमोर दुचाकी लावून थांबला होता. यावेळी आकाश दिंडे व त्याचा मित्र रूपेश कांबळे याठिकाणी आले. त्यांनी हेडगे याला तू ज्या युवतीच्या मागे लागला आहेस तिच्यावर मी प्रेम करतो. तू तिचा नाद सोड, असा दम दिला. या वादातून त्यांच्यात झटापट झाली. यावेळी हेडगे याने बॅगमधील चाकू काढून दिंडेच्या छाती, कंबरेवर वार केल्याची कबुली दिली. (प्रतिनिधी)