स्वाभिमानीकडून १९ ला चक्का जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:24 AM2021-03-17T04:24:45+5:302021-03-17T04:24:45+5:30
जयसिंगपूर : लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले तातडीने माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १९ मार्च रोजी ...
जयसिंगपूर : लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले तातडीने माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १९ मार्च रोजी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली. कोल्हापुरातील राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदीच्या पुलावर चक्का जाम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची मंगळवारी बैठक पार पडली. शेट्टी म्हणाले, आम्ही गतवर्षापासून लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करण्याची मागणी करीत आहोत. मात्र, राज्य सरकार झोपेचे सोंग घेत आहे. कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट सुरू आहे. मंत्र्यांचे बंगले सजवायला यांच्याकडे पैसे आहेत. मात्र, सर्वसामान्यांना वीज बिलात सवलत द्यायला पैसे नाहीत. लॉकडाऊनची भीती घालून आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा राज्यभर तीव्र पडसाद उमटतील, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.
कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पुलावर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असून, सर्वपक्षीयांनी यामध्ये सामील व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, आदिनाथ हेमगिरे, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, संदीप कारंडे, विठ्ठल मोरे, शैलेश आडके, रमेश भोजकर, अविनाश मगदूम, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.