शेतकरी संघटनेकडून बांबवडे येथे चक्का जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:21 AM2021-02-07T04:21:55+5:302021-02-07T04:21:55+5:30
बांबवडे : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष यांच्या ...
बांबवडे : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष यांच्या वतीने वाढती महागाई व अन्यायकारक कृषी कायद्यांविरोधात ‘रास्ता रोको’ करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व भाई भरत पाटील व जयसिंग पाटील यांनी केले.
बांबवडे येथे कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर व बैलगाडीसह मोर्चा काढून महामार्ग अडवून धरला. या ‘रास्ता रोको’मुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.
यावेळी पोलीस उपअधीक्षक अनिल कदम, पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांनी रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले, महामार्ग मोकळा करून दिला व नंतर कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले. या आंदोलनामध्ये भरत पाटील, जयसिंग पाटील, अवधूत जानकर, सुरेश माऊंटकर ,पद्मसिंह पाटील, रामभाऊ लाड, अमर पाटील, अनिल पाटील, संग्राम पाटील, पांडुरंग पोवार, सुभाष पाटील, इत्यादी सहभागी झाले होते.
फोटो ०६ बांबवडे रास्ता रोको
बांबवडे येथे शेतकरी संघटनांकडून रास्ता रोको आंदोलन करताना भाई भरत पाटील, जयसिंग पाटील, अवधूत जानकर,पद्मसिंह पाटील, रामभाऊ लाड व मान्यवर उपस्थित होते.