कोल्हापुरात पोलिसांनीच उधळला चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:21 AM2021-02-07T04:21:19+5:302021-02-07T04:21:19+5:30
कोल्हापूर : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शनिवारी पुकारण्यात आलेले चक्काजाम आंदोलन कोल्हापुरात सुरु होण्याआधीच पोलिसांनी बळाचा वापर करुन ...
कोल्हापूर : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शनिवारी पुकारण्यात आलेले चक्काजाम आंदोलन कोल्हापुरात सुरु होण्याआधीच पोलिसांनी बळाचा वापर करुन उधळून लावले. दाभोळकर कॉर्नर चौकात रस्ता रोखण्यासाठी आलेल्या किसान संघर्ष समन्वय समितीच्या आंदोलकांना आंदोलन सुरु करण्याआधीच पोलीस व्हॅनमध्ये जबरदस्तीने काेंबण्यात आले. यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी ‘नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी, मागे घ्या, मागे घ्या, काळे कायदे मागे घ्या’ अशा त्वेषपूर्ण घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये जाेरदार झटापट झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.
दिल्लीत सुरु असलेले शेतकरी आंदोलन केंद्र सरकारकडून दडपले जात असल्याने देशभर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी राजधानी दिल्ली वगळता देशभर चक्काजाम आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार कोल्हापुरातही दाभोळकर कॉर्नर चौकात सकाळी ११ ते १ यावेळेत चक्काजामचे आयोजन समन्वय समितीकडून केले होते. त्यामुळे ठरल्याप्रमाणे आंदोलक ११ वाजल्यापासून दाभोळकर कॉर्नर चौकात जमले. याठिकाणी तासभर भाषणे झाल्यानंतर चक्काजाम करण्यासाठी मानवी साखळी करण्यास सुरुवात करताच शांत बसलेले पोलीस एकदम आक्रमक झाले.
एकाचवेळी शंभरभर पोलीस रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. अचानक सुरु झालेल्या या कारवाईमुळे आंदोलकांचाही गोंधळ उडाला. उदय नारकर, नामदेव गावडे, चंद्रकांत यादव, सतीशचंद्र कांबळे यांना ओढतच गाडीत कोंबण्यात आले. एवढ्यात माजी खासदार राजू शेट्टी हे आंदोलनस्थळी पोहोचले आणि आंदोलकांमध्ये पुन्हा जोश संचारला. शेट्टी यांनी चौकातच ठिय्या मारल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आधीच व्हीनस कॉर्नर, कावळा नाका येथून वाहतून अन्य मार्गाने वळवली होती. पोलिसांनी कडे करुन शेट्टी यांनाही उचलून पोलीस व्हॅनमध्ये नेले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. सर्व आंदोलकांना शाहूपुरीत पोलिसांनी नेले. काहीवेळ थांबवून घेत नंतर सुटका करण्यात आली.
या आंदाेलनात दिलीप पवार, शिवाजीराव परुळेकर, गिरीश फोेडे, बी. एल. बरगे, रघुनाथ कांबळे यांच्यासह डाव्या संघटनांचे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
चौकट ०१
कोल्हापूरकरांनो साथ द्या
अन्यायी कायदे दुरुस्त करायला कोल्हापूरकर भाग पाडतात, हे टोल आंदोलनातून दाखवून दिले आहे. आता अन्यायी शेतकरी कायदेही रद्द करण्यासाठी दीर्घपल्ल्यांची लढाई लढण्यास कोल्हापूरकर सज्ज आहेत. सरकारला विचार करायला भाग पाडणारे आंदोलन कोल्हापुरातून उभारु, साथ द्या, असे भावनिक आवाहन चंद्रकांत यादव यांनी केले.