चकोते ग्रुपचा स्वच्छता अभियानात पुढाकार
By admin | Published: March 19, 2015 08:56 PM2015-03-19T20:56:37+5:302015-03-19T23:50:31+5:30
३०० बसस्थानके करणार चकाचक : अण्णासाहेब चकोते यांचा संकल्प
जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील यशस्वी उद्योजक चकोते ग्रुप आॅफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अण्णासाहेब चकोते यांनी उद्योगाबरोबर सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम केले आहे. प्रत्येकवर्षी अनोखा उपक्रम राबवून आजपर्यंत त्यांनी समाजासाठी कार्य केले आहे. त्याचप्रमाणे यावर्षीही आपल्या वाढदिनी २४ मार्चला एक अनोखा उपक्रम राबविण्याचा संकल्प चकोते यांनी केला असून, ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत ३०० बसस्थानकांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
उद्योजक अण्णासाहेब चकोते यांनी गेली २५ वर्षे बेकरी उद्योगात आपला नावलौकिक मिळविला आहे. उद्योगातील यशस्वी वाटचालीबरोबर सामाजिक बांधीलकी जपण्याचे कार्य ते मोठ्या जोमाने करीत आहेत. विविध सामाजिक कार्य करीत असताना प्रत्येक वाढदिनी एक नवीन विधायक व समाजाला दिशा देणारा उपक्रम राबविण्याची परंपरा त्यांनी निर्माण केली आहे. वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप, दुष्काळग्रस्त भागात पाणी व चारा वाटप, रक्तदान, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, अपंग व गतिमंद मुलांना दत्तक घेणे, असे उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. २०१३ साली डफळापूर (ता. जत) हे गाव दत्तक घेऊन तब्बल पाच महिने दररोज सव्वा लाख लिटर पाणीपुरवठा व चारा वाटप त्यांनी केले होते. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेला ‘स्वच्छ भारत अभियान’ हा उपक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. अण्णासाहेब चकोते यांचा ४१ वा वाढदिवस २४ मार्च २०१५ रोजी साजरा होत असून, यानिमित्त महाराष्ट्रातील व सीमाभागातील २४ जिल्ह्यांतील ३०० बसस्थानकांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये चकोते ग्रुपचे सर्व कर्मचारी, वितरक, रिटेलर्स, हितचिंतक असे जळपास दहा हजार लोक सहभागी होणार आहेत.
स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी ३०० स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्य झाडू, टोपली, कॅप, मास्क, आदी साहित्य पुरविले जाणार आहे. याचबरोबर वाढदिनी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, फळवाटप, आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. एक यशस्वी मराठी उद्योजक म्हणून चकोते यांनी नावलौकिक तर मिळविला आहेच. चकोते ग्रुपच्या नांदणी, लातूर युनिटमधून उत्पादनाची कीर्तीची पताकाही उंचावत आहेत. (प्रतिनिधी)
वयाच्या १६ व्या वर्षी व्यावसायिक जीवनाची सुरुवात केली होती. येत्या जूनपासून रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू होत असून, वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबविणार आहोत. स्वच्छता अभियान हा राज्यातील पहिला विधायक उपक्रम असून, या अभियानातून लोकांना स्वच्छतेची सवय लागावी, हा हेतू आहे. सामाजिक उपक्रमातून समाधान मिळते.
- अण्णासाहेब चकोते,
अध्यक्ष, चकोते ग्रुप आॅफ इंडस्ट्रीज.