कोल्हापूर जिल्हा परिषदेतही चलन घोटाळा
By Admin | Published: November 19, 2016 01:09 AM2016-11-19T01:09:42+5:302016-11-19T01:06:03+5:30
कुणी तरी एक शक्कल लढविली. जिल्हा परिषदेचा सर्व व्यवहार कॅनरा बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेत आहे
कोल्हापूर : देशभर नोटा रद्द करण्याचा आणि बदलून घेण्याचा घोळ सुरू असताना शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा परिषदेतही वेगळाच चलन घोटाळा उघडकीस आला. यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली.
केंद्र सरकारने मोठ्या रकमेच्या नोटा रद्द केल्यामुळे बँकांत सर्वत्र गर्दी आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांकडेही असलेल्या पाचशे व हजारांच्या नोटा बदलून घ्यायच्या होत्या. परंतु, त्यांना बँकेत जाऊन रांगेत थांबणे शक्य नसल्याने कुणी तरी एक शक्कल लढविली. जिल्हा परिषदेचा सर्व व्यवहार कॅनरा बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेत आहे. या बँकेशी संपर्क साधून जिल्हा परिषदेमध्ये नोटा बदलून देण्याचे आऊटलेट सुरू करावे, असे बँकेला सुचविले. त्यानुसार बँकेने आपला एक अधिकारी देऊन जिल्हा परिषदेत सुविधा सुरू केली. परंतु, बँकांतील गर्दी वाढल्यानंतर त्या अधिकाऱ्याला जिल्हा परिषदेत येणे शक्य झाले नाही. त्यामुळे ज्यांच्या नोटा बदलायच्या आहेत, त्यांनी त्यांचे आधार व पॅनकार्ड झेरॉक्स आणि नोटांचे नंबर लिहून बँकेत पाठवावेत, असे सांगण्यात आले. त्यानुसार १६० कर्मचारी व अधिकाऱ्यांचे प्रत्येकी चार हजार रुपयांप्रमाणे पैसे गोळा करण्यात आले व बँकेत नोटा बदलण्यासाठी जिल्हा परिषदेचा कर्मचारी गेला. परंतु, गर्दी असल्याने बँकेतून फक्त ४० लोकांचेच पैसे बदलून मिळाले. हे पैसे मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी हे पैसे आपापसांत वाटून घेतले.
आपल्या पैशाचे काय झाले, म्हणून कर्मचाऱ्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली तर त्या कर्मचाऱ्यांचे पैसे बदलून नेले असल्याचे उघडकीस आले. कुणाचे पैसे बदलून मिळाले, हे समजले नसल्याने जे पैसे मिळाले ते अधिकाऱ्यांनी आपापसांत वाटून घेतले. कर्मचाऱ्यांनी याबद्दल विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
यासंदर्भात पत्रकारांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांना विचारणा केली. त्यांनी या घटनेस दुजोरा दिला. आपणासही दोन हजार मिळाले असून, कागदपत्रांचा गैरवापर झाला आहे का? याची चौकशी करावी लागेल, असे उत्तर त्यांनी दिले.
पैसे एकाचे आणि खिशात घातले दुसऱ्याने या ‘आयजीच्या जिवावर बायजी उधार’ प्रवृत्तीची जिल्हा परिषदेत जोरदार चर्चा रंगली.