पक्षविरोधी भूमिकेचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:51 AM2019-03-11T00:51:38+5:302019-03-11T00:51:43+5:30

विश्वास पाटील कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक विरुद्ध शिवसेनेचे संजय मंडलिक या जुन्याच ...

Challenge of anti-party role | पक्षविरोधी भूमिकेचे आव्हान

पक्षविरोधी भूमिकेचे आव्हान

Next

विश्वास पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक विरुद्ध शिवसेनेचे संजय मंडलिक या जुन्याच पैलवानांत पुन्हा कुस्ती होणार आहे. गेल्या निवडणुकीत देशात मोदी लाट असतानाही महाडिक यांनी ती दोन्ही काँग्रेसच्या एकजुटीच्या जोरावर रोखली होती; परंतु या निवडणुकीत त्यांच्यासोबत हे दोन्ही पक्षच किती प्रामाणिक राहतात, हाच निकाल ठरविणारा मुद्दा आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक गटाची निश्चित ताकद आहे. त्याच गटाचा आधार घेऊन अनेकांनी राजकीय सत्तेचा लाभ उठविला आहे, हे खरे असले तरी महाडिक गटाची काठी मजबूत आहे व त्या काठीला कोणत्याही पक्षाचा झेंडा लावला तरी आम्ही निवडून येतो, अशी त्यांची भावना झाली आहे. त्यामुळेच खासदार महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणून निवडून आले; परंतु त्यांचा गेल्या साडेचार वर्षांतील वावर हा भाजपला ताकद देणारा आहे. त्यावरूनच काँग्रेसमधील आमदार सतेज पाटील यांनी तर त्यांच्याविरोधात उघडपणे शड्डू ठोकला आहे आणि राष्ट्रवादीतही अंतर्गत खदखद आहे. पक्षाच्या अध्यक्षांनी नेत्यांना तराटणी देऊन प्रचारात सक्रिय केले तरी ते कितपत मनापासून काम करतात, यावरच यावेळेचा निकाल लागणार आहे. पक्ष आपल्या सोबत नाही, हे खासदार महाडिक यांच्या लक्षात आल्यामुळेच त्यांचा भाजपकडून किंवा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेकडून लढण्याचा प्रयत्न होता; परंतु त्यात त्यांना यश न आल्याने आता ते राष्ट्रवादीतून रिंगणात उतरले आहेत. जी मिळेल ती पक्षाची ताकद, महाडिक गट, भागीरथी महिला संस्था, गोकुळ दूध संघाची सत्ता आणि गेल्या साडेचार वर्षांत खासदार म्हणून केलेली विकासकामे, संसदरत्न पुरस्कार मिळवून निर्माण केलेली प्रतिमा घेऊन ते या निवडणुकीस सामोरे जात आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली तरी ते काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून नव्हे तर महाडिक गटाचेच उमेदवार असल्यासारखे प्रचारात उतरल्याचे दिसते.
शिवसेनेचे कोल्हापुरातून एकदा पक्षाचा खासदार करण्याचे स्वप्न आहे; परंतु ते अद्याप पूर्ण झालेले नाही. भाजप व शिवसेनेची युती झाली आहे. गेल्या निवडणुकीत संजय मंडलिक यांनी जोरदार धडक दिली; परंतु त्यांचा निसटता पराभव झाला. त्या वेळेला त्यांच्यासोबत ‘मोदी करिष्मा’ होता. या वेळेला ती जादू काही प्रमाणात ओसरली आहे. पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर हवा थोडी बदलली असली तरी भाजप व शिवसेना यांची पक्षीय एकजूट किती एकसंध होते यालाही महत्त्व आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली पत्नी जरी विरोधी पक्षांकडून उभी राहिली तरी आपण युतीधर्म पाळून मंडलिक यांचाच प्रचार करणार, असे जाहीर केले असले तरी भाजपचे आमदार अमल महाडिक व त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक हे आतापासूनच राष्ट्रवादीच्या प्रचारात उघडपणे उतरले आहेत. म्हणजे राष्ट्रवादीप्रमाणेच भाजपमध्येही फंदफितुरी आहे. संजय मंडलिक यांची ‘नॉट रिचेबल’ प्रतिमाही ठासून मांडण्याचा महाडिक गटाचा प्रयत्न आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे तीन आमदार आहेत. कागल, राधानगरी, भुदरगड परिसरात स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांना मानणारा मतदार आहे. या सगळ्यांची एकजूट बांधल्यास ते चांगली हवा निर्माण करू शकतात.
विधानसभा (२०१४) मतदारसंघ निहाय मिळालेली मते
विधानसभा मतदारसंघ धनंजय महाडिक संजय मंडलिक
(राष्ट्रवादी) (शिवसेना)
चंदगड ८२२०५ १,० १७५३
राधानगरी ११७२९२ ९३००४
कागल १०५६२७ ११४७७३
कोल्हापूर दक्षिण ९९६०५ ९२३५१
करवीर ११९९४४ ८५३६५
कोल्हापूर उत्तर ८२५११ ८६३९६
एकूण ६०७६६५ ५७४४०६
राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक हे ३३२५९ मतांनी विजयी

Web Title: Challenge of anti-party role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.