शियेत शिवसेनेचा वारू रोखण्याचे आव्हान
By admin | Published: January 9, 2017 12:19 AM2017-01-09T00:19:34+5:302017-01-09T00:19:34+5:30
निगवे ‘गणा’त भाऊगर्दी : बहुरंगी लढती झाल्या तरी ‘अंडर करंट’चे झटके बसण्याची शक्यता
विश्वास चरणकर ल्ल कोल्हापूर
‘मिनी विधानसभा’ अर्थात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्यास काहीच दिवस शिल्लक असल्याने शिये मतदारसंघात वातावरण हळूहळू तापत चालले आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात आता शिवसेनेने आपली पकड घट्ट केली आहे. विधानसभेची पूर्वतयारी म्हणून काँग्रेस पुन्हा आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करेल, तर शिवसेना आपली पकड अधिक घट्ट करण्याच्या तयारीत असेल. तर राष्ट्रवादी गेल्यावेळच्या पराभवाचे उट्टे काढण्याचा प्रयत्न करेल.
शिये जिल्हा परिषद मतदार संघ यावेळी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. येथे गेल्या वेळी शिवसेनेच्या बाजीराव पाटील (नाना) यांनी बाजी मारली होती. राष्ट्रवादीच्या प्रदीप पाटील-भुयेकर यांनी चांगली झुंज दिली होती. बाजीराव पाटील यांनी पाच वर्षांत स्वत:च्या आणि आमदार चंद्रदीप नरके व त्यांच्या विविध फंडातून मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. त्याशिवाय पाटील यांचा वैयक्तिक जनसंपर्क चांगला असून, तरुण शिवसैनिकांची चांगली फळी हाताशी आहे. त्यामुळे शिवसेनेकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. पण गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या साथीला असलेला भाजप यावेळी स्वतंत्र लढणार असल्याने त्यांची ताकत थोडी कमी होणार आहे.
गेल्या जि. प. निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर घसरला होता. काँग्रेसची ताकद पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक या तिघांमध्ये विभागली गेली असल्याने आणि जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वमान्य प्रभावी नेतृत्त्व नसल्याने पक्षाला ‘बुरे दिन’ आले आहेत. पी. एन. पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत या कार्यकर्त्यांना ‘चार्ज’ केले होते. तरीही येथे पक्षाला बहुमत मिळाले नाही. पक्षाची उमेदवारी कोणत्या गटाला मिळणार, यावर तिन्ही गटाची रणनीती ठरणार आहे.
राज्याचे माजी आरोग्यमंत्री स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांच्या काळात येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचंड प्राबल्य होते. त्यांच्या निधनाने त्यांचे जुने जाणते कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षाच्या आश्रयाला गेले आहेत. काही निष्ठावान कार्यकर्ते याला अपवाद आहेत. या पक्षाची धुरा आता प्रदीप पाटील-भुयेकर या युवा नेतृत्त्वाच्या खांद्यावर आहे. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता. यंदा पं. स. साठी शिये गणातून त्यांच्या मातोश्री मालिनी पाटील रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे त्यांची आणि पक्षाची प्रतिष्ठा पुन्हा पणाला लागली आहे.
भाजपची ताकत येथे मर्यादित असली तरी, जनसुराज्यशक्ती पक्ष आणि ताराराणी आघाडी हे एकत्र आल्यास त्यांना संधी मिळू शकते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अजून पत्ते खोललेले नाहीत.
निगवे दुमाला पंचायत समिती मतदार संघ खुला झाल्याने येथे इच्छुकांची भाऊगर्दी आहे. पं. सं.चा शिये गण ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. येथे सेनेच्या सागर शिंदे, उदय सुतार आणि कृष्णात पोवार या तीन निष्ठावान कार्यकर्त्यांनी आपल्या सौभाग्यवतींसाठी तिकीट मागितल्याने पक्षनेतृत्त्वाची येथे कसोटी लागणार आहे. या निवडणुकीत बहुरंगी लढतीचे चित्र असले तरी पक्षापलीकडे जावून काही ठिकाणी शह काटशहाचे राजकारण रंगणार आहे. हे अंडर करंट कोणाला तारणार, कोणाला मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
इच्छुक उमेदवार$$्रिजिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून मनिषा सतीश कुरणे (शिये), राष्ट्रवादी कॉग्रेसकडून वैशाली पांडुरंग कांबळे (शिये), राष्ट्रीय कॉग्रेसकडून कु. रोहिणी बाबासो कामत-कांबळे (शिये), प्रियांका सागर कांबळे, सुनंदा देवानंद चोपडे (निगवे दुमाला), राणी मारुती पोवार (केर्ले), ताराराणी आघाडीकडून सुप्रिया दत्तात्रय मोरे (शिये), तर जनसुराज्यकडून शियेतील मंगल अनिल कांबळे हे उमेदवार इच्छुक आहेत. डॉ. सुषमा विलास सातपुते आणि मंगल कृष्णात चौगले (निगवे दु.) या इच्छुकांनी अद्याप पक्ष निश्चित केलेला नाही.
शिये पंचायत समितीसाठी शिवसेनेकडून रुपाली उदय सुतार, शारदा कृष्णात पोवार (भुयेवाडी), नयना सागर शिंदे (शिये), राष्ट्रीय काँग्रेसकडून नंदाताई विलास गुरव (शिये), प्रियांका सचिन चौगले (भुयेवाडी), राष्ट्रवादी कॉग्रेसकडून मालिनी दादासो पाटील-भुयेकर, भाजपकडून संजीवनी बुवा, जनसुराज्यकडून मिनाक्षी जयसिंग लोखंडे (शिये) हे इच्छुक आहेत.
निगवे दुमाला पंचायत समितीसाठी शिवसेनेकडून सुरेश पाटील, अर्जुन पाटील, कृष्णात जासूद, दिलीप यादव (निगवे दुमाला), चंद्रकांत पाटील, सागर शिर्के (केर्ले), भीमराव पाटील (केर्ली), राष्ट्रीय काँग्रेसकडून प्रकाश पाटील, पंडित लाड, सागर राजेंद्र पाटील, बाजीराव लाड (निगवे दुमाला), सचिन चौगले (केर्ली), सचिन माने (केर्ले) राष्ट्रवादीकडून विश्वनाथ पोवार (केर्ली), भाजपकडून विक्रम माने, संदीप व्हरांबळे (केर्ली), अजिंक्य माळी, संजय कदम (निगवे दुमाला), तर ’स्वाभिमानी’कडून बाळासाहेब रानगे (निगवे दुमाला) हे प्रमुख इच्छुक आहेत.
गावे : शिये, भुये, भुयेवाडी, जठारवाडी, सादळे-मादळे, निगवे, केर्ली, केर्ले, रजपूतवाडी, सोनतळी, पडवळवाडी, प्र. चिखली.(एक प्रभाग)