नव्या कुलगुरूंसमोर संशोधनवाढीचे आव्हान
By admin | Published: June 18, 2015 01:17 AM2015-06-18T01:17:10+5:302015-06-18T01:20:16+5:30
गतिमान कामकाजाची अपेक्षा : महाविद्यालये, कॅम्पस् डेव्हलपमेंटला बळ द्यावे; गुणवत्ता टिकविण्याचीही गरज
संतोष मिठारी - कोल्हापूर -संशोधन, नावीन्याचा ध्यास आणि सकारात्मक विचारप्रवृती असलेल्या नूतन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता टिकविण्यासह संशोधनवाढीचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्यासह संलग्नीत महाविद्यालये आणि विद्यापीठ परिसरातील विकासाला (कॅम्पस् डेव्हलपमेंट) बळ देण्याचे काम त्यांना तातडीने करावे लागणार आहे. शिवाजी विद्यापीठातील घटकांना डॉ. शिंदे यांच्याकडून विद्यार्थी केंद्रित आणि गतिमान प्रशासकीय कामकाजाची अपेक्षा राहणार आहे.
शिवाजी विद्यापीठाने यापूर्वी विद्यार्थी केंद्रित व नावीन्यपूर्ण उपक्रम, संशोधन कार्य, आदी विभागांतील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेकडून (नॅक) ‘अ’ (ए) मानांकन मिळविले आहे. त्याद्वारे पुणे, मुंबईकडून गुणवत्तेचा केंद्रबिंदू प्रयत्नपूर्वक दक्षिण महाराष्ट्राकडे सरकविला आहे. हे मानांकन टिकविण्याचे आव्हान नूतन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना पेलावे लागणार आहे. महाविद्यालयीन पातळीवरील संशोधन क्षेत्राकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. विद्यापीठ कॅम्पस्मधील विविध विभागांत संशोधनाचे काम सुरू आहे. मात्र, पेटंट मिळविण्याचे प्रमाण कमी आहे. ते वाढविण्यासह या संशोधनाला व्यावसायिकतेची जोड देण्याचे काम त्यांच्याकडून होणे गरजेचे आहे. कॉमन फॅसिलिटी, कन्व्हेनशियल आणि इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून कॅम्पस डेव्हलपमेंट होणे आवश्यक आहे. प्र-कुलगुरू, कुलसचिव, बीसीयुडी संचालक या पदांवर सकारात्मक विचार प्रवृत्तीच्या व्यक्तींना संधी देत त्यांना प्रशासन गतिमान करावे लागणार आहे.
डॉ. शिंदे यांच्या कुलगुरू पदावरील निवडीमुळे मराठवाड्याच्या गुणवत्तेला चकाकी मिळाल्याची भावना येथील शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त झाली. ही चकाकी कायम राखण्यासह स्थापनेची पन्नाशी ओलांडलेल्या आणि ‘अ’ मानांकन मिळविलेल्या शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता टिकविण्यासह आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक वाढविण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे.
‘रुसा’चा पाठपुरावा
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार विद्यापीठाने तीन वर्षांसाठीचा सुमारे १५७.३७ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे.
यातून विद्यापीठातील पायाभूत सुविधा विकास, संशोधन, नवनिर्मिती व दर्जा सुधार, आदींबाबत कामकाज केले जाणार आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा नेटाने होणे अपेक्षित आहे.
विद्यापीठ घटकांच्या अपेक्षा
प्राचार्य या घटकाची विद्यापीठाबाबत नेहमीच सकारात्मक भूमिका असून, ती यापुढेही कायम राहील. ‘रुसा’ योजनेच्या प्रस्तावाचा पाठपुरावा नव्या कुलगुरूंकडून व्हावा. महाविद्यालये सुरू झाली तरी अजून काही परीक्षांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे परीक्षा विभागाचे काम सुरळीत आणि भक्कम करावे. महाविद्यालयांतील संशोधनासाठी बळ द्यावे.
- डॉ. क्रांतिकुमार पाटील,
अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशन
चिटणीस, विद्यापीठ सेवक संघ
विद्यार्थ्यांशी संबंधित निर्णयामध्ये या घटकाचा विचार घेतला जात नाही. आधुनिकतेच्या नावाखाली परीक्षा विभाग विश्वासार्हता हरवत चालला आहे. संशोधनाच्या सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले जाते; पण प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचे इनोव्हेशन थांबले आहे. रोजगाराभिमुख शिक्षण देण्यात विद्यापीठ कमी पडत आहे. एकूणच विद्यार्थीभिमुखता विद्यापीठ विसरले की काय? अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे नव्या कुलगुरूंची विद्यार्थी केंद्रित भूमिका असावी. - अमित वैद्य,
जिल्हाप्रमुख, अखिल
भारतीय विद्यार्थी परिषद
विद्यापीठातील सर्व घटकांना सोबत घेऊन विद्यार्थी केंद्रबिंदू मानून नूतन कुलगुरूंनी काम करावे. विद्यापीठ कायद्यानुसार कामकाज व्हावे. बेकायदेशीर गोष्टींना त्यांनी पायबंद घालावा.
- प्रा. रघुनाथ ढमकले,
जिल्हाध्यक्ष, विद्यापीठ शिक्षक संघ
विद्यापीठातील सर्व घटकांना सोबत घेऊन विद्यार्थी केंद्रबिंदू मानून नूतन कुलगुरूंनी काम करावे. विद्यापीठ कायद्यानुसार कामकाज व्हावे. बेकायदेशीर गोष्टींना त्यांनी पायबंद घालावा. - प्रा. रघुनाथ ढमकले,
जिल्हाध्यक्ष, विद्यापीठ शिक्षक संघ