इचलकरंजीतील गुन्ह्यांचे पोलिसांपुढे आव्हान
By Admin | Published: October 9, 2015 12:11 AM2015-10-09T00:11:00+5:302015-10-09T00:46:15+5:30
गुंडगिरी डोके वर काढतेय : कडक कारवाई करण्याची गरज; तीन मुख्य गुन्ह्यांसह अनेक प्रकरणे प्रलंबित
इचलकरंजी : येथील कृष्णकुंज बंगल्यावर पडलेला दरोडा, तसेच पालनकर ज्वेलर्स दरोडा, त्यानंतर आमराई रोडवर झालेला
खून असे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात इचलकरंजी पोलिसांना अद्याप तरी यश आले नाही. त्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षकपदी नव्याने नियुक्त झालेले दिनेश बारी यांनी यामध्ये लक्ष घालून तपास करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
बारी रूजू झाल्यापासून त्यांना कुंभमेळ्याच्या बंदोबस्तासाठी जावे लागले. काही महिने बंदोबस्त करून इचलकरंजीत परतले तेव्हा येथील संवेदनशील गणेशोत्सव बंदोबस्त सुरू होता. हे सर्व काही पार पडले आहे. आता पूर्वीपासून प्रलंबित असलेल्या प्रमुख गुन्ह्यांमध्ये त्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. तीन वर्षांपासून कृष्णकुंज बंगल्यावर पडलेल्या दरोड्याचा तपास अद्याप प्रलंबित आहे. अनेक अधिकारी आले आणि गेलेही; मात्र या तपासाबाबत कोणीही ‘ब्र’ शब्द काढायला तयार नाही. यामुळे या तपासात नेमका काय ‘अर्थ’ आहे ज्यामुळे हा तपास गुलदस्त्यात आहे, हे समजू शकले नाही.
सात महिन्यांपूर्वी येथील पालनकर ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकून दरोडेखोरांनी सुमारे पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. अनेकवेळा या तपासात प्रगती झाल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे गुन्हा उघडकीस येण्याची शक्यताही बळावली होती. मात्र, पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आणि याचाही तपास गुलदस्त्यात राहिला. त्यापाठोपाठ येथील सांगली रोडवर असलेल्या आमराई मळा परिसरात एका शेतमजुराचा खून झाला. त्याच्या तपासकामी परिवारासह अनेक लोकांना आणून चौकशी केली. मात्र, आरोपी सापडले नाहीत. गरिबाच्या खुनाचा शोध लागला नाही तरी चालत असावे. त्यामुळेच पोलीस यंत्रणा थंडावली की काय, असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे. याबरोबरच अनेक कमी गंभीर स्वरुपाचे गुन्हेही प्रलंबित आहेत. तसेच किरकोळ गुंडही डोके वर काढताना दिसत आहेत. त्यांना वेळीच चाप लावल्यास गुंडगिरीला आळा
बसेल; अन्यथा पूर्वीप्रमाणे शहरात गुंडगिरी व खंडणीचे प्रकार सुरू होतील. पोलीस दलाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे बनले आहे. (वार्ताहर)
बारी साहेब जनतेशी नाते जोडा
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या सूचनेनुसार पोलीस दलाने जनतेशी नाते जोडले जावे, या हेतूने गणेशोत्सव काळात मंडळांच्या आरत्या व ईदवेळी शुभेच्छा देण्यासाठी वरिष्ठ अधिकारी इचलकरंजीत फेऱ्या मारताना दिसले. मात्र, नूतन अप्पर पोलीस अधीक्षक बारी अद्याप कोणालाही दिसले नाहीत. त्यांचे कोणतेही स्वतंत्र काम किंवा पथक नेमून स्वतंत्र कारवाई अद्याप तरी नागरिकांना दिसली नाही.
आता
‘बारी’ वरिष्ठ अधिकाऱ्यांची
बऱ्याच वर्षांपासून गुंडगिरीमुळे धगधगत असलेली वस्त्रनगरी एस. चैतन्य यांनी पदभार स्वीकारल्यामुळे शांत केली. गुन्हेगारीचा बीमोड करण्याबरोबरच अवैध धंदेही पूर्णपणे बंद केले. आजही इचलकरंजीत त्यांच्या नावाचा दबदबा आहे. त्यांच्यापाठोपाठ त्याच जागी रुजू झालेले विनायक नरळे यांनीही धडाकेबाज कारवाई करीत आपले स्थान निर्माण केले. आता ‘बारी’ वरिष्ठ अधिकाऱ्यांची आहे.
जिल्हा पोलीसप्रमुखांचा बातम्यांवर विश्वास नाही
काही दिवसांपूर्वी ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पोलिसांच्या कारनाम्यांचे व दांडगाव्याचे वृत्त पाहून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सूचना कराव्यात, अशी मागणी जिल्हा पोलीसप्रमुखांकडे केली. मात्र, त्यांनी दैनिकांत काहीही छापले जाते. ठोस पुरावा असल्यास संपर्क साधा. आपण पाहू, असे उत्तर दिले.