अंबाबाई आराखडा राबविण्याचे आव्हान
By admin | Published: June 10, 2017 08:17 PM2017-06-10T20:17:15+5:302017-06-10T20:17:15+5:30
महापालिकेच्या प्रकल्पांना नकार घंटेचे ग्रहण
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेने हाती घेतलेल्या प्रकल्पांना नकार घंटेचे ग्रहण लागले आहे. या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा दिलेल्या वेळेत प्रभावीपणे राबविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्यांना कोल्हापूरकरांची साथ आवश्यक आहे. अंबाबाई मंदिर विकास आराखड्यावर मुंबईत शुक्रवारी झालेल्या बैठकीत मुख्य सचिव सुमित मलिक यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना किती वर्षांत पहिला टप्पा पूर्ण करणार हे विचारल्यावर महापालिकेने दोन वर्षांचे अल्टिमेटम दिले. त्यावर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला कोल्हापूरचा अत्यंत वाईट अनुभव आहे. येथे कोणतेही प्रकल्प मार्गी लागत नाहीत. दहा वर्षांपासून नगरोत्थान प्रकल्प महापालिकेने पूर्ण केलेला नाही. त्यामुळे दोन वर्षांत खरेच तुम्ही हे काम करणार, असा उपरोधिक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर महापालिका अधिकारी निरुत्तर झाले आणि मंदिराचा आराखडा नक्की पूर्ण करू, असे आश्वासन दिले आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत महापालिकेच्या प्रकल्पांचा इतिहास पाहता अनुभव अतिशय वाईट आहे. नगरोत्थान, थेट पाईपलाईन, सांडपाणी व्यवस्थापनाचा एसटीपी प्लॅन, पंचगंगा नदी शुद्धिकरण यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प अजूनही रखडले आहेत. ते पूर्ण व्हायला आणखी किती कालावधी लागेल, हेदेखील सांगता येत नाही. ‘आयआरबी’च्या रस्ते प्रकल्पाने अनेकांचा जीव घेतला आणि टोल आंदोलनामुळे शासनाला भुर्दंड बसला. कधी ठेकेदार चुकीची कामे करतात, तर कधी नागरिक आंदोलने करतात. त्यामुळे कोल्हापुरात कोणताही नवा प्रकल्प राबवायला कंपन्या आणि अधिकारी तयार होत नाहीत, अशी बदनामी झाली आहे. याचेच प्रत्यंतर शुक्रवारच्या बैठकीत आले. त्यामुळे अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यालाही अशी आडकाठी न बसता दिलेल्या वेळेत काम पूर्ण करणे हे महापालिकेपुढील आव्हान आहे. त्यासाठी कोल्हापूरच्या नागरिकांकडूनही सहकार्य अपेक्षित आहे. ---------------- बदलांचा आताच अंतर्भाव व्हावा आराखड्याला मुख्य सचिवांची मान्यता मिळाल्याने केवळ मुख्यमंत्र्यांच्या लेखी परवानगीची औपचारिकता बाकी आहे. पुढील पंधरा दिवसांत ते देखील पूर्ण होईल. त्यामुळे नागरिकांनी किंवा नगरसेवकांनी सुचविलेल्या मात्र आराखाड्यानुरूप संयुक्तिक असलेल्या सूचनांचा आताच अंतर्भाव करावा लागणार आहे. विद्यापीठ गेटसमोरील दर्शन मंडपाला सर्वांचाच विरोध आहे. त्यासाठी फरासखान्याची वास्तूच योग्य असल्याचे अमरजा निंबाळकर यांनी बैठकीत मांडले आहे. याशिवाय महाद्वारमधून प्रवेश बंदी, बिंदू चौक सबजेलमुळे मल्टिलेव्हल पार्किंग होणार का, अशा सर्व बाबींचा तातडीने विचार होऊन फेरबदल करणे आवश्यक आहे. ----------------- राज्यात संरक्षित स्मारकाच्या नियमांचा विचार पूरातत्त्व खात्याच्यावतीने अंबाबाई मंदिराला राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्याची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आली आहे. केवळ पुजाऱ्यांनी हरकत घेतलेल्या करवीर आणि अंबाबाईची मालकी या शब्दांमुळे विलंब झाला आहे. ही त्रुटी दूर झाली की काही दिवसांतच मंदिर पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित जाईल. त्यामुळे हेरिटेज वास्तूंच्या नियमांना अनुसरून विकासकामे करावी लागणार आहेत. ----------------- अंबाबाई मंदिराचा फोटो वापरावा ----------------