कडगावचा गड भेदण्याचे के.पीं.ना आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:03 AM2017-09-18T01:03:54+5:302017-09-18T01:03:54+5:30

Challenge KPG to disturb the fort of Kadgaon | कडगावचा गड भेदण्याचे के.पीं.ना आव्हान

कडगावचा गड भेदण्याचे के.पीं.ना आव्हान

googlenewsNext



शिवाजी सावंत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत भुदरगड तालुक्यातील कडगाव गट क्रमांक सहामध्ये दिनकरराव जाधव आणि के. जी. नांदेकर यांचा अभेद्य गड भेदताना माजी आमदार के. पी. पाटील गटाला जिवाचे रान करावे लागणार आहे.
गेल्या पंचवीस वर्षांचा इतिहास पाहता या गटावर दिनकरराव जाधव आणि के. जी. नांदेकर गटाचे प्राबल्य आहे. माजी आमदार के. पी. पाटील यांच्या गटातून गतवेळचे संचालक धनाजीराव देसाई व के. ना. पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, तर दौलतराव जाधव यांचा उमेदवारी अर्ज छाननीतून बाद झाल्याने आता के. ना. पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार आहे. आमदार आबिटकर गटातून दिनकरराव जाधव आणि के. जी. नांदेकर यांची उमेदवारी निश्चित आहे. दौलतराव जाधव यांनी कारखान्यात ऊस पुरवठा न केल्याच्या कारणावरून त्यांचा अर्ज बाद झाला; परंतु त्यांनी वेळोवेळी ऊस नेण्यासाठी कारखाना प्रशासनाकडे अर्ज दाखल केले होते. पण, त्यांचा ऊस नेला गेला नाही. माजी आमदार के.पीं.चे निकटवर्तीय असणाºया या नेत्यांना नामुष्कीजनक माघार घ्यावी लागली.
कारखान्याच्या गतनिवडणुकीत माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या विरोधात के. पी. पाटील गटातून के. जी. नांदेकर यांनी विक्रमी मतांनी विजय मिळविला होता. यावेळी प्रथमच दिनकरराव जाधव यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. के. जी. नांदेकर हे एखादी पंचवार्षिक वगळता १९७९ पासून कारखाना संचालक मंडळात कार्यरत आहेत. ते एकदाही पराभूत झालेले नाहीत; पण माजी आमदार के. पी. पाटील आणि के. जी. नांदेकर यांच्यातील तणाव वाढत गेला. ‘के.जीं.’नी हुतात्मा वारके सूतगिरणीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला व ते आमदार आबिटकर गटात सामील झाले. जि. प. आणि पं. स.च्या निवडणुकीत जि.प.ची एक व पं.स.च्या दोन्ही जागेवर विक्रमी मताधिक्य मिळविले आहे. यावेळी अनेकांनी के.जी. आणि दिनकरराव जाधव गट एकत्र राहतील का? अशी शंका उपस्थित केली होती; परंतु ती शंकाच ठरली. मागील जि.प.च्या निवडणुकीत केजी हे केपी यांच्या गटात होते. त्यावेळी जि.प.ची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली होती. म्हणजे जिकडे केजी तिकडे विजय हे समीकरण झाले आहे. या जमेच्या बाजू पाहता माजी आमदार के. पी. पाटील गटाला या गटातील निवडणूक अतिशय अडचणीची ठरणारी आहे. सध्या के. पी. पाटील यांच्यासोबत ‘गोकुळ’चे संचालक विलास कांबळे, ईश्वरा डाकरे, काकासो देसाई, काशिनाथ देसाई, प्रकाश डेळेकर, तमास पिंटो, बाळासाहेब कोटकर ही मंडळी आहेत. दिनकरराव जाधव आणि के. जी. नांदेकर यांच्यासोबत त्यांचे गट आणि आमदार आबिटकर गटातील संदीप वरंडेकर यांच्यासारख्या तरुण नेत्यांची फौज आहे. या विभागातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे पडसाद या निवडणुकीवर उमटण्याची शक्यता आहे. गावागावांत अंतर्गत गटबाजीला ऊत आला असून, कोण कुणाच्या गटात आहे, हे सांगणे कठीण होऊन बसले आहे. उमेदवारी नाकारल्यावर कोण कोठे जाणार हे सांगणे कठीण आहे. त्यांची समजूत काढताना नेत्यांचे कसब पणाला लागणार आहे. या गटात गतनिवडणुकीतील विजयाची परंपरा कायम राखण्यासाठी के. जी. नांदेकर व दिनकरराव जाधव यशस्वी होणार? की, माजी आमदार के. पी. पाटील यांचा गट इथले प्राबल्य मोडीत काढणार हे लवकरच समजेल.
ठळक मुद्दे : सध्या या मतदारसंघात ५४ गावे असून, ८ हजार ६५ सभासद पात्र आहेत. ४०० हून अधिक मतदारसंख्या असलेली तिरवडे आणि कडगाव ही दोन गावे आहेत. या जिल्हा परिषद मतदारसंघावर दिनकरराव जाधव गटाने बाजी मारली. कारण त्यांच्यासोबत के. जी. नांदेकर होते. गेली पंचवीस वर्षे सलग संचालक होण्याचा के. जी. नांदेकर यांचा इतिहास आहे, तर सलग सोळा वर्षे अध्यक्षपद भूषविण्याचा मान माजी आमदार दिनकरराव जाधव यांना मिळाला आहे.
गटातील समाविष्ट गावे ५४
सोनारवाडी, मडूर, शेळोली, तिरवडे, वेंगरुळ, कडगाव, नितवडे, करडवाडी, दोनवडे, शेणगाव, वासणोली, ममदापूर, नांदोली, सोनुर्ली, पाचर्डे, नवले, कुंभारवाडी, राणेवाडी, वरपेवाडी, फये, खेडगे, पडखंबे, एरंडपे, गडबिद्री, मठगाव, मेघोली, करंबळी, वेसर्डे, कारिवडे, देवर्डे, कोंडुशी, म्हासरंग, पाळ्याचाहुडा, अंतीवडे, पाटगाव, हणमंते, तांब्याचीवाडी, डेळे, अंतुर्ली, तांबाळे, मानी, चिवाळे, शिवडाव, देवकेवाडी, कुडतरवाडी, देऊळवाडी, निष्णप, अनफ खुर्द, चांदमवाडी, पारदेवाडी, न्हाव्याचीवाडी, भालेकरवाडी, थड्याचीवाडी, सुक्याचीवाडी.

Web Title: Challenge KPG to disturb the fort of Kadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.