कोल्हापूरमध्ये भाजपसमोर सत्ता टिकविण्याचे आव्हान--जिल्हा परिषद अध्यक्ष निवड होणार अटीतटीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 11:50 AM2019-11-27T11:50:06+5:302019-11-27T11:51:48+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेची अध्यक्षपदाची निवडणूकही अटीतटीची होणार ...
कोल्हापूर : महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यामुळे कोल्हापूरजिल्हा परिषदेची अध्यक्षपदाची निवडणूकही अटीतटीची होणार आहे. भाजपला येथील सत्ता राखणे सोपे नाही; तर दुसरीकडे दोन्ही कॉँग्रेस शिवसेनेच्या सदस्यांच्या मदतीने सत्तांतर करण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
आवाडे यांची ताराराणी आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि चंदगड येथील ‘युवक क्रांती’ या स्थानिक आघाड्यांच्या भूमिकेला पुन्हा एकवार महत्त्व येणार आहे. मात्र, आवाडे यांनी राज्यस्तरावर भाजपला पाठिंबा दिला आहे. गेल्यावेळी पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल यांना पाठिंबा देण्यासाठी प्रकाश आवाडे यांनी नकार दिल्याने अखेर गणित बिघडले आणि महादेवराव महाडिक यांनी सर्व ताकद पणाला लावत कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनाही अनुपस्थित राहायला लावून स्नुषा शौमिका महाडिक यांना अध्यक्ष केले.
भाजप १४, जनसुराज्य ६, कुपेकर युवक आघाडी चंदगड २, आवाडे ताराराणी आघाडी २, स्वाभिमानी शेतकरी संघटना २, महाडिक यांची ताराराणी आघाडी ३, शिवसेना ७, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या तिघांची झालेली अप्रत्यक्ष मदत आणि अपक्ष एक अशा एकूण ४० जणांची मोट बांधली गेल्याने भाजपच्या शौमिका महाडिक अध्यक्ष झाल्या होत्या.
आता नव्या समीकरणामध्ये प्रकाश आवाडे आणि राजू शेट्टी यांच्या चार सदस्यांनी आघाडीसोबत यावे यासाठी आता प्रयत्न होणार आहेत. अध्यक्षपदासाठी ३४ मतांची गरज आहे. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी, मंडलिक, आबिटकर यांची आघाडी २६ वर आहे. (सदस्य बंडा माने यांच्या निधनाने कॉँग्रेसचे एक मत कमी झाले आहे. ही पोटनिवडणूक १२ डिसेंबर रोजी होणार आहे.) त्यांना आठ मतांची गरज आहे. वरील सहाजण आघाडीकडे गेल्यास राष्ट्रवादीचे नेते व्ही. बी. पाटील यांच्या अपक्ष स्नुषा रसिका पाटील आघाडीकडे जाणार यात शंका नाही.
काँग्रेसचे सचिन बल्लाळ, रेश्मा देसाई आणि राष्ट्रवादीचे विजय बोरगे या तिघांनी महाडिक यांच्या घरातील उमेदवार म्हणून अनुपस्थित राहून मदत केली होती. या तिघांनाही सदस्यत्व टिकविण्यासाठी व्हिप बजावून दबाव टाकला जाऊ शकतो. यात यश आल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे संख्याबळ ३९ वर जाऊ शकते. त्यामुळे विधानसभेनंतर आता जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षाला धार येण्याची शक्यता आहे.
..............................
‘गोकुळ’मुळे अडचण
राहुल देसाई यांचे बंधू धैर्यशील हे ‘गोकुळ’चे संचालक आहेत, तर चंदगडचे संचालक दीपक पाटील यांचे निकटवर्तीय सचिन बल्लाळ यांनी गेल्यावेळी गैरहजर राहून भाजपला मदत केली होती. त्यामुळे महादेवराव महाडिक यांच्याकडून या दोघांवर भाजपसोबत राहण्यासाठी दबाव येऊ शकतो. त्यातून ते पुन्हा गैरहजर राहणार का, हा खरा प्रश्न आहे. शिवसेनेचे सत्यजित पाटील यांच्या सदस्यांसमोरही हाच प्रश्न उभा ठाकणार आहे.
.........................................
राज्यस्तरावरील पाठबळही महत्त्वाचे
राज्यात ‘महाविकास आघाडी’ने निर्णायक बाजी मारली आहे. त्यामुळे कोल्हापुरातही हाच पॅटर्न राबवून सध्या शिवसेनेच्या सर्वच सदस्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत राहण्याबाबत व्हिप बजावला जाऊ शकतो. तसे झाले तर मात्र भाजपसाठी ती मोठी अडचण ठरेल. यामध्ये खासदार संजय मंडलिक यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.