अवजड वाहतूक रोखण्याचे आव्हान
By admin | Published: December 30, 2015 09:43 PM2015-12-30T21:43:54+5:302015-12-31T00:21:56+5:30
जुजबी कारवाई : वाळू वाहतुकीमुळे बंधारा कमकुवत
संदीप बावचे == शिरोळ -महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधारा अनेक समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. बॅक वॉटरबरोबर सीमाभागातील गावात दळणवळणासाठी सोयिस्कर ठरावा यासाठी बंधारा उभारण्यात आला. अवजड वाहतुकीला बंदी असतानाही राजरोसपणे ही वाहतूक सुरू असते. सामाजिक संघटनांनी आंदोलने करूनही केवळ पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळेच बंधाऱ्याला अवकळा आली आहे.
स्व. आ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या अथक प्रयत्नांतून ज्या उद्देशाने राजापूर बंधाऱ्याची उभारणी झाली त्याची पायमल्लीच मोठ्या प्रमाणात झाली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेला हा बंधारा दळणवळणाच्या दृष्टिकोनातून या परिसरातील गावांना फायदेशीर ठरला. बंधाऱ्यावरून अवजड वाहतुकीला बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात वाळू वाहतुकीबरोबर माती, दगड, विटा याचीही वाहतूक होत असल्यामुळे बंधारा कमकुवत होण्यात भर पडली आहे.
बंधाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेल्या सुरक्षा कमानीही वाळू तस्करी करणाऱ्यांनी उखडून टाकल्या असल्याचे येथील नागरिकांतून सांगण्यात येते. दोन राज्यांतील सीमाभागाचा फायदा घेत, दरवर्षी वाळू तस्कर बंधाऱ्यानजीकच यांत्रिकी बोटी टाकून बेसुमार वाळू उपसा करतात. सीमेचा प्रश्न दाखवीत शिरोळ महसूल विभागाकडून जुजबी कारवाई केली जाते. ठोस कारवाई होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राजापूर बंधारा असला तरी सांगली पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित तो असल्यामुळे हा बंधारा ‘ना घरका, ना घाटका’ बनला आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांच्या बेफिकीरपणामुळेच वाळू उपसा असो अथवा अवजड वाहतूक याला कोणतेच बंधन राहिले नाही. रखवालदार नसल्यामुळे ‘आओ-जावो घर तुम्हारा’ अशी अवस्था बंधाऱ्याची आहे. या ठिकाणी बंदूकधारी सुरक्षारक्षक नेमण्याची गरज निर्माण झाली आहे. सुमारे ३५ वर्षे पूर्ण झालेल्या बंधाऱ्याची दयनीय अवस्था झाली आहे. योग्य देखभाल, दुरुस्ती वेळोवेळी झाली असती तर बंधाऱ्याची ही अवस्था झाली नसती, अशी येथील नागरिकांची प्रतिक्रिया आहे. पाटबंधारे विभागाबरोबरच लोकप्रतिनिधीही तितकेच जबाबदार आहेत. (समाप्त)
खासदार, आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष
शेतकरी चळवळीतून खासदार व आमदार पदावर पोहोचलेले
खा. राजू शेट्टी, आ. उल्हास पाटील बंधाऱ्याच्या या प्रश्नाबाबत लक्ष घालतील. राजापूर बंधाऱ्याचे
महत्त्व दोघांनाही माहीत असल्यामुळे निश्चित पाठपुरावा करून बंधाऱ्याला वाचविण्यासाठी
प्रयत्न करतील, अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत
आहे.
दूरदृष्टीतून निर्मिती
पाऊस कमी, आणि महापुराची हमी असलेल्या शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिकांची तहान भागविण्याबरोबर शेतीलाही पाणी मिळावा या उद्देशाने दूरदृष्टी ठेवून बंधारा बांधण्यात आला. गेली ३५ वर्षे बॅक वॉटरच्या पाण्यामुळे २२ हून अधिक गावांना पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीलाही पाणी मिळत आहे. यामुळे वेळीच लक्ष घालून बंधारा वाचविण्याची गरज आहे.