महसूल उद्दिष्टाचे आव्हान
By admin | Published: October 28, 2014 10:31 PM2014-10-28T22:31:06+5:302014-10-29T00:14:48+5:30
शिरोळ तहसील : वाळू लिलावातून उत्पन्न वाढीसाठी होणार प्रयत्न
संदीप बावचे- जयसिंगपूर -गौण खनिज विभागाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शिरोळ महसूल विभागाला यंदाही वाळू लिलावाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. वाळू, मुरुम, माती व दगड यातून सुमारे दहा कोटी रुपयांचे उद्दिष्ट महसूल प्रशासनासमोर आहे. विधानसभा निवडणुकीच्या कामानंतर आता महसूल उद्दिष्टाचे आव्हान त्यांच्या समोर आहे.
महसूल असो अथवा मुद्रांक शुल्क सर्वाधिक महसुलाचे उत्पन्न मिळवून देणारा तालुका म्हणून शिरोळ तालुका जिल्ह्यात ओळखला जातो. एकेकाळी दीड कोटी रुपयांचे साधारण उत्पन्न असणाऱ्या या तालुक्यात आता वाळू लिलाव नऊ कोटी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचला आहे. तालुक्यात चाळीसहून अधिक मजूर संस्था कार्यरत आहेत. शिवाय माती, मुरुम आणि वाळू लिलावातून महसूल मोठ्या प्रमाणात मिळतो. गतवर्षीही वाळू, माती, मुरुम व दगड यातून नऊ कोटी रुपयांचे उद्दिष्ट तहसील कार्यालयाला होते. केवळ शिरोळ तालुक्यातील वाळू लिलावातूनच नऊ कोटींचा महसूल प्रशासनाला मिळाला. यंदा दहा कोटी रुपयांचे गौण खनिज महसुलाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तालुक्यातील
८० हून अधिक वाळूचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे गेले आहेत. प्रशासकीय पातळीवर वाळूचे लिलाव लांबणीवर न पाडता लवकर करून घेण्याची शक्यता आहे. गतवर्षी वाळू लिलावातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला, तर ठेकेदारांचीही चांदी झाली. सप्टेंबरची मुदत मिळाल्यामुळे ठेकेदारांनी पुरेपूर फायदा उचलला. पावसाळ्यानंतर सप्टेंबर अखेरचे दहा ते बारा दिवस वाळू उपसा झाला. गौण खनिजांतून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असल्यामुळे महसूल प्रशासन उद्दिष्ट पार करण्यासाठी वाळू लिलावाची वाट पाहत आहे. एकूणच विधानसभा निवडणुकीच्या कामानंतर तहसील प्रशासनाला आता महसूल उद्दिष्टाचे आव्हान आहे.
शिरोळ तालुक्यात गेल्या हंगामात मोठ्या प्रमाणात वाळू तस्कारांनी उच्छाद मांडला होता. तालुक्यात पन्नासहून अधिक बेकायदा वाळूचे प्लॉट तहसीलदार सचिन गिरी यांच्या पथकाने उद्ध्वस्त केले होते. आतापर्यंतची सर्वाधिक मोठी कामगिरी गिरी यांनी बजावली. गेल्या आठवड्यात लिलाव होण्यापूर्वीच राजापूर येथे बेकायदा वाळू उपसा सुरू झाला होता. तो महसूल विभागाने बंद पाडला असला, तरी येणाऱ्या वाळू हंगामात बेकायदा वाळू उपशाचे मोठे आव्हान ‘महसूल’समोर असणार आहे.