राजू शेट्टी यांच्या विरोधात मोदींनाच उभे करण्याचे स्वाभिमानीचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 05:57 PM2017-10-28T17:57:38+5:302017-10-28T18:06:47+5:30
भाजपमध्ये दम असेल तर त्या पक्षाने हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टी यांच्या विरोधात मोदी यांना रिंगणात उतरवावे, त्यांना पळता भुई थोडी करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत देण्यात आला. या परिषदेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील शेतकऱ्यांची प्रचंड उपस्थिती आहे.
कोल्हापूर , दि. २८ : भाजपमध्ये दम असेल तर त्या पक्षाने हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टी यांच्या विरोधात मोदी यांना रिंगणात उतरवावे, त्यांना पळता भुई थोडी करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत देण्यात आला. या परिषदेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील शेतकऱ्यांची प्रचंड उपस्थिती आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सोळावी ऊस परिषद सुरु असून त्याला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद आहे. खासदार राजू शेट्टी ज्या मार्गावरून परिषद स्थळी येणार आहेत, त्या मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या आहेत. येतांना त्यांच्या अंगावर शेतकऱ्यांनी फुलांची उधळण करुन त्यांचे स्वागत केले आहे. आता प्रतिक्षा आहे, ती त्यांच्या भाषणाची. या परिषदेत उसाचा अंतिम दर ते जाहीर करणार आहेत.
स्वाभिमानीने खा.राजू शेट्टी यांच्या विरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच रिंगणात उतरण्याचे आवाहन केले आहे. यामुळे स्व. मंडलिक यांनी २००९ लोकसभा निवडणूकीत थेट केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना आवाहन केल्याची आठवण कार्यकर्त्यांना झाली. या सभेत शेतकरी नेते जालंदर पाटील, रविकांत तुपकर यांचीही भाषणे झाली. त्यांनीही आपल्या भाषणात सरकारवर टीका केली.
सतीश काकडे यांची खालच्या पातळीवरुन टीका
सदाभाऊ बारामतीला आल्यास त्यांना कपडे फाटेपर्यंत मार देऊ, त्याला घरात घेऊ नका. आपले वासे मोजल्याशिवाय राहणार नाही. हे बेणं आमच्यासमोर दारू पीत असे अशी अत्यंत खालच्या पातळीवरील टीका शेतकरी कृषी समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी सतीश काकडे यांनी या सभेत केली.
जयसिंगपूर येथे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १६ वी ऊस परिषद सुरु झाली आहे. दरवर्षी या परिषदेनंतर उसाचे राजकारण पेटते त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या परिषदेकडे लागून असते. यावर्षीची ऊस परिषद सदाभाऊ खोतांशिवाय होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडली आहे. सदाभाऊ खोतही स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून नव्या रयत क्रांती संघटनेची स्थापना केली आहे.
ऊस परिषदेपूर्वीच राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांच्यावर टीका करत उसाचा दर म्हणजे मटक्याचा आकडा नाही अशी टीका केली होती. आता या सर्व पार्श्वभूमीवर राजू शेट्टी आपल्या भाषणात काय बोलणार याकडे सगळ्यांचे कान लागले आहेत.
दरवर्षी ऊस परिषदेनंतर राजू शेट्टी साखरेच्या दरासाठी आंदोलन करून कारखानदार आणि सरकारला वेठीस धरतात. या ऊस परिषदेनंतर राजू शेट्टीच्या आंदोलनाचा काय पवित्रा असणार आहे याच्या कडे कारखानदार आणि सरकारचे डोळे आहे. या ऊस परिषदेत राजू शेट्टीच्या भाषणाची उत्सुकता लागून आहे.