पक्षीय मर्यादेत कामाचे महाडिकांसमोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:55 AM2019-09-11T00:55:02+5:302019-09-11T00:55:09+5:30
समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्या ३0-३५ वर्षांमध्ये महाडिक परिवाराला प्रथमच पक्षीय मर्यादेत काम करावे लागणार ...
समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्या ३0-३५ वर्षांमध्ये महाडिक परिवाराला प्रथमच पक्षीय मर्यादेत काम करावे लागणार आहे. ज्या पद्धतीने धनंजय महाडिक यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पाचव्या दिवशी राज्य उपाध्यक्षपद देण्यात आले, ते पाहता या पक्षाशी एकनिष्ठ राहून भाजप तळागाळांत रुजविण्याची कामगिरी झोकून देऊन महाडिक यांना पार पाडावी लागणार आहे.
महादेवराव महाडिक यांनी त्या त्यावेळी गरज असेल त्या पद्धतीचे राजकारण करताना अगदी कॉँग्रेसचे विधान परिषदेचे दोनवेळा आमदार असतानाही पक्ष, गट, तट, विचारधारा यांचा फारसा विचार केला नाही. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत धनंजय महाडिक यांनी सुरुवातीला शिवसेनेतून लोकसभा लढविली. ते हरले. दुसऱ्यांदा त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांनी आपली ताकद सदाशिवराव मंडलिक यांच्या पाठीमागे लावली.
नंतर मात्र राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हावर ते खासदार झाले; परंतु तिसऱ्यांदा त्यांचा दारुण पराभव झाला. महाराष्ट्रामध्ये युतीची सत्ता आल्यानंतर त्यांचे स्वकियांशी कधी पटले नाही. मात्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे ते निकटवर्तीय बनले, ही वस्तुस्थिती आहे. सतेज पाटील यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेचा फटका बसून लोकसभेला त्यांचा पराभव झाला आणि अपेक्षेप्रमाणे ते भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले.
आता भाजपचा राज्य उपाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांना बंधू अमल यांचा उघड प्रचार करता येणार आहे. अन्य सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांना युती झाली नाही तर ‘कमळ’ एके ‘कमळ’ आणि युती झाली तर ‘कमळ’ आणि ‘धनुष्यबाण’ यांचा प्रचार करावा लागणार आहे. ‘मला लोकसभेला विरोध करणाºयांचा मी ‘कार्यक्रम’ करणार आहे,’ असे सांगताना युती झाली तर त्यांना युती धर्म पाळावा लागणार आहे. प्रत्येक तालुक्यातील भाजपचे जुने आणि नवे कार्यकर्ते, राष्ट्रवादीतून त्यांच्यासमवेत जे काही येतील ते आणि त्यांच्या युवाशक्तीचे कार्यकर्ते यांचा मिलाफ घडवून त्यांना काम करावे लागेल.
चार वर्षे गुंतवणूक करावी लागेल
सांगलीत, सोलापुरात आणि कोल्हापुरात वेगवेगळी भूमिका घेण्यावरही मर्यादा येणार आहेत. अशा पद्धतीने त्यांनी गुंतवणूक केल्यास त्यांना ‘भाजप’मध्ये चांगले भवितव्य असल्याचे मानले जाते. त्याचाच एक भाग म्हणून त्यांना विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील एखादे पद देण्याचाही ‘शब्द’ देण्यात आला आहे.