धनंजय महाडिक भाजपात गेले खरे; पण ३० वर्षांत जे केलं नाही, ते काम जमेल?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 10:16 AM2019-09-11T10:16:24+5:302019-09-11T12:36:05+5:30
गेल्या ३0-३५ वर्षांमध्ये महाडिक परिवाराला प्रथमच पक्षीय मर्यादेत काम करावे लागणार आहे. ज्या पद्धतीने धनंजय महाडिक यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पाचव्या दिवशी राज्य उपाध्यक्षपद देण्यात आले, ते पाहता या पक्षाशी एकनिष्ठ राहून भाजप तळागाळात रुजविण्याची कामगिरी झोकून देऊन महाडिक यांना पार पाडावी लागणार आहे.
समीर देशपांडे
कोल्हापूर : गेल्या ३0-३५ वर्षांमध्ये महाडिक परिवाराला प्रथमच पक्षीय मर्यादेत काम करावे लागणार आहे. ज्या पद्धतीने धनंजय महाडिक यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पाचव्या दिवशी राज्य उपाध्यक्षपद देण्यात आले, ते पाहता या पक्षाशी एकनिष्ठ राहून भाजप तळागाळात रुजविण्याची कामगिरी झोकून देऊन महाडिक यांना पार पाडावी लागणार आहे.
तीस वर्षांपूर्वी महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील आणि अरुण नरके यांची ‘मनपा’आघाडी तेजीत होती. हे तिघे ठरवतील ते कोल्हापूरच्याराजकारणात घडत असे. त्या त्या वेळी कॉंग्रेसमध्येच जी गटबाजी होती, तिचा फायदा घेत ‘मनपा’आघाडीने आपले राजकारण केले.
महादेवराव महाडिक यांनी त्या त्या वेळी गरज असेल त्या पद्धतीचे राजकारण करताना अगदी कॉँग्रेसचे विधान परिषदेचे दोन वेळा आमदार असतानाही पक्ष, गट, तट, विचारधारा यांचा फारसा विचार केला नाही. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत धनंजय महाडिक यांनी सुरुवातीला शिवसेनेतून लोकसभा लढविली. ते हरले. दुसऱ्यांदा त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांनी आपली ताकद सदाशिवराव मंडलिक यांच्या पाठीमागे लावली.
नंतर मात्र राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हावर ते खासदार झाले; परंतु तिसऱ्यांदा त्यांचा दारुण पराभव झाला. महाराष्ट्रामध्ये युतीची सत्ता आल्यानंतर त्यांचे स्वकियांशी कधी पटले नाही. मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे ते निकटवर्तीय बनले, ही वस्तुस्थिती आहे. सतेज पाटील यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेचा फटका बसून गेल्या लोकसभेला त्यांचा पराभव झाला आणि अपेक्षेप्रमाणे ते भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले.
भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष पाटील, आमदार सुरेश हाळवणकर वगळता जिल्हा बांधू शकेल आणि स्वत:ची यंत्रणा असणारा असा तिसरा नेता नाही, हे वास्तव आहे. ‘गोकुळ’च्या माध्यमातून महादेवराव महाडिक यांनी प्रत्येक तालुक्यात जी ताकद निर्माण करून ठेवली आहे, ती वृद्धिंगत करण्याची भूमिका धनंजय यांनी गेल्या दोन वर्षांत घेतली आहे. त्यामुळे त्यांनी ‘गोकुळ’विरोधातील संघर्षात ‘गोकुळ’च्या बाजूने उडी घेतली होती.
आता भाजपचा राज्य उपाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांना बंधू अमल यांचा उघड प्रचार करता येणार आहे. मात्र अन्य सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांना युती झाली नाही तर ‘कमळ’ एके ‘कमळ’ आणि युती झाली तर ‘कमळ’ आणि ‘धनुष्यबाण’ यांचा प्रचार करावा लागणार आहे. ‘मला लोकसभेला विरोध करणाऱ्यांचा मी ‘कार्यक्रम’ करणार आहे,’ असे सांगताना युती झाली तर त्यांना युतीधर्म पाळावा लागणार आहे.
प्रत्येक तालुक्यातील भाजपचे जुने आणि नवे कार्यकर्ते, राष्ट्रवादीतून त्यांच्यासमवेत जे काही येतील ते आणि त्यांच्या युवाशक्तीचे कार्यकर्ते यांचा मिलाफ घडवून त्यांना काम करावे लागेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच असल्याने आणि महाडिक यांचा भाजपमध्ये तेच मोठा आधार असल्याने, प्रसंगी मनाला मुरड घालून महाडिक यांना ते सांगतील तीच भूमिका राजकारणामध्ये घ्यावी लागणार आहे.
चार वर्षे गुंतवणूक करावी लागेल
धनंजय महाडिक यांना भाजपशी एकनिष्ठ राहत चार वर्षे तन, मन, धनाने पक्षसेवा करावी लागेल. सहकारी संस्थांमध्येही भाजपला कसे पुढे नेता येईल, याचा विचार करावा लागेल. सांगलीत, सोलापुरात आणि कोल्हापुरात वेगवेगळी भूमिका घेण्यावरही मर्यादा येणार आहेत. अशा पद्धतीने त्यांनी गुंतवणूक केल्यास त्यांना ‘भाजप’मध्ये चांगले भवितव्य असल्याचे मानले जाते. याचाच एक भाग म्हणून त्यांना विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील एखादे पद देण्याचाही शब्द देण्यात आला आहे.