बंडखोरी रोखण्याचे पक्षांसमोर आव्हान
By admin | Published: February 7, 2017 11:33 PM2017-02-07T23:33:35+5:302017-02-07T23:33:35+5:30
हातकणंगले तालुका : स्वबळाचा नारा; कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या
दत्ता बिडकर---हातकणंगले तालुक्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांची कोणाशी युती नाही आणि कोणाशीही आघाडी नाही. सर्वच स्वबळाचा नारा देत आहेत. यामुळे कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. म्हणून प्रत्येक मतदारसंघात बंडखोरीचे प्रमाण वाढले आहे. बंडोबांना थंड करण्यासाठी नेत्यांना कसरत करावी लागणार आहे.
हातकणंगले तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा अर्ज भरण्याचा कालावधी संपला आहे. तालुक्यातील ११ जिल्हा परिषदेसाठी १0९ आणि २२ पंचायत समितीसाठी तब्बल २0१ अर्ज दाखल झाले आहेत. नेतेमंडळींनी सर्वच इच्छुकांना अर्ज दाखल करा, मग काय ते बघू, असा शब्द दिला होता. अर्ज आॅनलाईन भरण्याची प्रक्रिया किचकट असतानाही कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पदरमोड करून अर्ज दाखल केले आहेत. शेवटच्या दिवसी, तर विक्रमी अर्ज दाखल झाल्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली आहे. इच्छुकांनी नेते मंडळींचा आदेश डावलून आपल्या सोयीनुसार अर्ज दाखल केले आहेत.
तालुक्यातील कबनूर, कोरोची, पट्टणकोडोली, हुपरी आणि रेंदाळ या पाच जिल्हा परिषद मतदारसंघांत प्रकाश आवाडे यांनी काँग्रेस पक्षाविरुद्ध बंड पुकारले आहे. आवाडे यांनी कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी स्थापन करून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर जयवंतराव आवळे यांनी यापैकी पट्टणकोडोली, हुपरी आणि रेंदाळमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार जाहीर करून आवाडे यांच्यावर कुरघोडी केली आहे. या पाच मतदारसंघांत आवाडे यांच्या आघाडी बरोबर काही मतदारसंघांत शिवसेनेची साथ आहे. तर काही मतदारसंघांत स्वाभिमानी शेतकरी संघटना बरोबर घेतली आहे. यामुळे शिवसेनेने जाहीर केलेली स्वबळावर लढण्याची भाषा कार्यकर्त्यांना रुचणारी नाही, हे स्पष्ट होते. पट्टणकोडोली मतदारसंघात शिवसेना व स्वाभिमानी आवाडे यांच्याबरोबर, तर हुपरी, रेंदाळमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमुळे कार्यकर्ते उघड नाराजी व्यक्त करीत आहेत.
तालुक्यात राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष एम. वाय. पाटील आणि तालुका अध्यक्ष दशरथ पिष्टे यांनी जाहीर केले होते. मात्र, अर्ज दाखल करण्याचा कालावधी संपला, तरी अर्ज दाखल केले नाहीत. राष्ट्रवादी कार्यकर्ते सैरभैर झाले असून, काही आवाडेंच्या तंबूत, तर काही भाजपच्या तंबूत गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व ठिकवून ठेवण्यासाठी धडपड करावी लागते आहे. तालुक्यात अरुण इंगवले आणि धैर्यशील माने म्हणजेच राष्ट्रवादी, असे समीकरण ओळखून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादी संपविण्यासाठी या दोघांना भाजपकडे ओढून हातकणंगले तालुक्यातील राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ गोठविण्याचे काम फत्ते केले आहे.
आदेश डावलून कार्यकर्ते कार्यारत
नेते मंडळीकडून स्वबळाची भाषा बोलली जात असली तरी तालुक्यातील सर्वच मतदारसंघांची स्थिती पाहता नेते मंडळींचा आदेश डावलून कार्यकर्ते स्वत:चा विचार करून स्थानिक पातळीवर युती आणि आघाडी करून अर्ज दाखल करीत असल्याने अर्ज माघारीनंतर नेते विरुद्ध कार्यकर्ते, असा सामना रंगणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
आॅनलाईन अर्ज भरणी : हजारांत
आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत काही नेट कॅफे आणि संगणकचालकांनी उमेदवारांची गरज ओळखून आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी हजार ते पाचशे रुपयांपर्यंत रक्कम घेतली.
शेवटच्या दिवसी तर आॅनलाईनचा दर चक्क चार ते पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचला होता. यावरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे अज्ञान स्पष्ट झाले आहे.