‘महाआघाडी’समोर स्वकीयांचेच आव्हान?
By admin | Published: January 9, 2017 11:35 PM2017-01-09T23:35:58+5:302017-01-09T23:35:58+5:30
सेना सावध : भाजप बाहेरून पाठिंबा, देसाई, होलम यांची बैठकीकडे पाठ
ज्योतीप्रसाद सावंत --आजरा साखर कारखाना निवडणुकीत अंतर्गत मतभेद विसरून सत्तेवर आलेल्या महाआघाडीत पहिल्याच बैठकीत कुरबुरी सुरू झाल्याने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींत सोयीच्या भूमिकेला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता बळावली आहे. महाआघाडीतून कारखाना निवडणुकीत उमेदवारी घेतलेले राजू होलम पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत, तर महाआघाडीतील ज्येष्ठ नेते श्रीपतराव देसाई यांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याने जि .प., पं. स. निवडणुकीत स्वकीयांचेच आव्हान उभे राहण्याची चर्चा जोर धरत आहे.आजरा साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीने राष्ट्रीय काँगे्रसवर राजकीय मात करीत अशोक चराटी, रवींद्र आपटे, विष्णुपंत केसरकर, शिवसेना-भाजप व स्वाभिमानी यांनी काठावरचे बहुमत मिळविले; परंतु गेल्या सात महिन्यांत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे.
सहदेव नेवगे, श्रीपतराव देसाई, बापूसाहेब देसाई, राजू होलम हे स्वीकृत संचालकपदी इच्छुक आहेत; परंतु विश्वनाथअण्णा करंबळी यांना संधी दिल्यानंतर स्वीकृत सदस्यपदाच्या दुसऱ्या जागेबाबत चर्चाही नाही, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे ही मंडळी सद्य:स्थितीत नाराजच आहेत. अशी परिस्थिती असताना ज्येष्ठ संचालक विष्णुपंत केसरकर व रमेश रेडेकर यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. तर स्वीकृत संचाकलपदी आपणाला संधी दिली जात नाही, या नाराजीतून तालुका संघाचे माजी उपाध्यक्ष राजू होलम यांनी थेट राष्ट्रवादीची वाट धरली आहे.
महाआघाडीचे ताराराणी आघाडीत विलीनीकरण हे अशोकअण्णा व ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे यांच्यादृष्टीने अवघड जागेचे दुखणे बनले आहे. शिवसेना तालुकाप्रमुख राजू सावंत यांनी ‘ताराराणी’त महाआघाडीच्या विलीनीकरणास थेट विरोध दर्शविला आहे तर भाजपचे तालुकाध्यक्ष देसाई यांनी असा निर्णय झालाच तर ताराराणीत भाजप असणार नाही. परंतु, बाहेरून पाठिंबा राहील, असे स्पष्ट केले.
एककीडे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सल्ल्यानुसार आपण सदर निर्णय घेतल्याचे चराटी जाहीर करीत असतानाच भाजप तालुकाप्रमुखांचे विधान बऱ्याच गोष्टी सांगून जाते. चंद्रकांतदादा व अशोकअण्णांची वाढलेली सलगी चराटी यांना
भाजप प्रवेशासाठी सुरू असलेला दबाव व यामुळे भाजपच्या कारभाऱ्यांचे तालुक्यात होणारे ‘कथित’ अवमूल्यन हे भाजप कार्यकर्त्यांचे दुखणे आहे.
उमेदवाऱ्या जसजशा जाहीर होतील, तसे महाआघाडीतील मतभेद वाढण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपकडे उमेदवार असूनही उमेदवारी मिळण्याची शक्यता दिसत नाही, तर शिवसेनेने सर्वत्र स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे.
आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी हे आघाडीतून ताकदीने उमेदवार निवडून आणण्यासाठी एकीकडे धडपडत असताना दुसरीकडे मात्र आघाडीतील कुरबुरी वाढू लागल्या आहेत, हे नाकारता येत नाही.
‘भाजप’मध्ये या लाल दिवा घ्या..
अशोक चराटी यांचा अण्णा-भाऊ संस्था समूहाचे जाळे लक्षात घेऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अशोकअण्णांना थेट भाजप प्रवेशाचे आवतन दिले असल्याची चर्चा आहे, तर काही मंडळी अशोकअण्णांनी तालुका भाजप हायजॅक केल्याचा आरोपही करीत आहेत. मात्र, भाजपच्या वरिष्ठांनी अण्णांची ‘पॉवर’ चांगलीच ओळखली आहे, हे मात्र निश्चित.