'त्या' दोन निरागस मुलींना भेटले साक्षात देव, ..अन् मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 12:38 PM2022-01-10T12:38:45+5:302022-01-10T12:41:02+5:30
तिचं आयुष्य जेमतेम चार महिने १२ दिवसांचं ! घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. त्यातच ती हृदयाला छिद्र घेऊनच जन्मली. आई-वडिलांवर तर संकट कोसळलेलं.
भारत चव्हाण
कोल्हापूर : तिचं आयुष्य जेमतेम चार महिने १२ दिवसांचं ! घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. त्यातच ती हृदयाला छिद्र घेऊनच जन्मली. आई-वडिलांवर तर संकट कोसळलेलं. पोटचा गोळा अशा भयंकर आजाराने ग्रस्त आणि उपचार करण्याची तर आपली आर्थिक ताकद नाही. काय करायचं सूचत नव्हतं. ओळखीतील नर्सच्या सल्ल्यावरून त्यांनी सीपीआर रुग्णालय गाठलं. नियतीने जरी शाप दिला असला तरी सीपीआर मध्ये साक्षात ‘देव’ भेटला. आव्हानात्मक शस्त्रक्रिया पार पडली आणि मुलीला जीवदान मिळाले.
राधानगरी तालुक्यातील चार महिन्याची मुलगी जन्माला आली, त्याचवेळी तिच्या हृदयाला छिद्र पडलेले होते. जन्मल्यापासून वारंवार निमोनिया व्हायचा. टाळू धडधडत राहायची. खासगी रुग्णालयात दाखविले तेंव्हा विविध तपासण्यांअंती तिच्या हृदयाला छिद्र असल्याने निदान झाले. मोठ्या शहरात हृदयाची चिरफाड करून शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगण्यात आले. आर्थिक परिस्थिती गरिबीची, त्यात खर्च न परवडणार असल्याने मुलीला दाखविण्यासाठी सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले.
वय कमी त्यात तिचे वजनही तीन किलो ८०० ग्रॅम इतके कमी होते. तपासण्या झाल्यावर तिच्या हृदयाला साडेचार एम. एम. जाडीचे छिद्र असल्याचे तसेच शुद्ध व अशुद्ध रक्त वाहिनी एकमेकांना जोडली असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. सीपीआर मधील डॉक्टरांच्या पथकाने अभ्यास, नियोजन केले आणि शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. गेल्या बुधवारी आव्हान स्वीकारून शस्त्रक्रिया पार पाडली.
डॉक्टरांनी मुलीच्या पायातील दीड-दोन एम. एम. जाडीच्या नसेतून सूक्ष्म कॅमेरा हृदयापर्यंत घेऊन गेले. जिथे छिद्र होते तेथे छत्री बसविली आणि छिद्र बंद केले. शस्त्रक्रियेत कोणतीही चिरफाड करण्यात आली नाही. केवळ बिनटाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आले. सीपीआर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी केली. मुलीची तब्बेत सुधारली आहे. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून मोफत करण्यात आली.
अधिष्ठाता प्रशांत दीक्षित, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हृदय शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय बाफना यांनी ही शस्त्रक्रिया केली. त्यांना हृदयरोग तज्ज्ञ डॉ. कुलदीप तोटावार, डॉ. माजीद मुल्ला, डाॅ. भूपेंद्र पाटील, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर सरवडे, डॉ. निधा इजाज यांनी मदत केली. भूलतज्ज्ञ डॉ. श्रीगणेश कामत तर स्टाफ देवेंद्र शिंदे, उदय बिरांजे, मधुरा जावडेकर, विद्या सिस्टर, देवरूकर यांचे सहकार्य मिळाले.
दोन वर्षांच्या मुलीवरही शस्त्रक्रिया यशस्वी
अशाच प्रकारची आणखी एका मुलीच्या हृदयाला असलेले छिद्र बिनटाक्यांची शस्त्रक्रिया करून बंद केले. ही मुलगी दोन वर्षांची असून, ती कागल तालुक्यातील आहे. या मुलीची सुद्धा तब्बेत आता ठणठणीत आहे. तिलाही लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे.