रात्री अकरापर्यंत खरेदीची संधी
By Admin | Published: January 21, 2016 12:19 AM2016-01-21T00:19:30+5:302016-01-21T00:27:52+5:30
उपनगरांतील ग्राहकांना फायदा : राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत; धावपळ थांबणार
कोल्हापूर : कार्यालय, कामावरून सुटी झाल्यानंतर अनेकांना करावी लागणारी खरेदीची धावपळ आता थांबणार आहे. कारण, दररोज रात्री अकरापर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाचे कोल्हापुरातील किरकोळ व्यापाऱ्यांनी स्वागत केले आहे. तर काहीजणांकडून दुकाने सुरू करण्यापेक्षा आम्हाला प्राथमिक सुविधा द्या, अशी मागणीही होत आहे. याचा फायदा उपनगरांतील ग्राहकांना जास्त होणार आहे.
मुंबई दुकाने व आस्थापना कायद्यांतर्गत विविध स्वरूपांतील दुकाने रात्री साडेआठपर्यंत सुरू ठेवण्याचा नियम आहे. त्यानुसार बहुतांश ठिकाणी दुकाने रात्री साडेआठनंतर बंद होण्यास सुरुवात होते. वाढत्या स्पर्धेमुळे विविध खासगी कंपन्या, संस्थांची कार्यालये सायंकाळी सातपर्यंत सुरू असतात. शिवाय शासकीय कार्यालयेही सहापर्यंत सुरू असतात. त्यानंतर येथील कर्मचारी आणि दिवसभरातील विविध स्वरूपांतील कामांमुळे ग्राहकांना दुकाने साडेआठनंतर बंद होत असल्याने धावपळ करून खरेदी करावी लागत होती. ग्राहकांच्या सोयीसाठी रात्री उशिरापर्यंत संबंधित दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी राज्यातील दुकानदार, व्यावसायिकांच्या संघटनांनी शासनाकडे केली होती. तिची दखल घेत शासनाने रात्री अकरा वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू
ठेवण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापुरातील होलसेल दुकानदारांसह हजारो ग्राहकांसाठी हा निर्णय सोयीस्कर ठरणारा आहे.
अधिकतर लोकांना खरेदीसाठी सायंकाळी सहानंतर वेळ मिळतो; पण, दुकाने रात्री साठेआठपासून बंद केली जात होती. ते त्यांना गैरसोयीचे होते. बदलत्या परिस्थितीत अकरापर्यंत दुकाने सुरू असणे ही काळाची गरज होती. शासनाने वेळ वाढविण्याचा घेतलेला निर्णय उपयुक्त ठरणारा आहे; तर काही दुकानदारांच्या मते दिवसा दुकानात गर्दी नसते. रात्री उशिरा सुरू करून काय फायदा होणार आहे? शासनाने व्यापारांना मूलभूत सुविधा पुरविल्या पाहिजेत. रात्री उशिरा दुकान खुले ठेवल्याने वीज बिल असो किंवा दुकानांतील कामगारांचा पगार; तो वेगळा द्यावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
कोल्हापुरात साधारणत: रात्री नऊपर्यंत ग्राहकांची खरेदी सुरू असते. वेळ वाढवून देऊन व्यापारी आणि ग्राहकांची शासनाने चांगली सोय केली आहे. शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. याचा फायदा उपनगरातील ग्राहकांना व किरकोळ दुकानदारांना होणार आहे.
- दिगंबर लोहार, संस्थापक,
कोल्हापूर किरकोळ दुकानदार असोसिएशन
याचा फारसा फायदा होणार नाही. कोल्हापूर शहराची हद्द लहान आहे. त्यामुळे ग्राहकाला खरेदीसाठी लांब असे काही जावे लागत नाही. तसेच रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू राहिल्याने वीजबिलासह दुकानांतील नोकरांची ड्यूटी शिफ्टप्रमाणे करावी लागणार आहे. त्यांचा खर्च वाढणार आहे.
- सचिन मिठारी, होलसेल व्यापारी