चांदाेली, वारणा प्रकल्पग्रस्तांचा आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:28 AM2021-03-01T04:28:15+5:302021-03-01T04:28:15+5:30
कोल्हापूर : श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली चांदोली, वारणा प्रकल्पग्रस्त आज, सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनास बसणार आहेत. ...
कोल्हापूर : श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली चांदोली, वारणा प्रकल्पग्रस्त आज, सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनास बसणार आहेत. दुपारी १ वाजता सुरू होणाऱ्या या आंदोलनात स्वत: भारत पाटणकर उपस्थित राहणार आहेत. तब्बल वर्षभरानंतर प्रकल्पग्रस्त पुन्हा आंदोलन करत आहेत.
पुनर्वसन, वसाहतीतील मूलभूत सुविधा, भत्ते या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्यावर्षी १८ फेब्रुवारीला या प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला होता, पण लॉकडाउन जाहीर झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. या कालावधीत प्रशासनाने प्रश्न सोडवणे अपेक्षित होते, पण तसे काही झाले नाही, म्हणून श्रमिक मुक्ती दलाने पुन्हा एकदा अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. जानेवारीअखेरीस बैठक झाली; परंतु प्रशासन प्रश्न सोडवण्याबाबत उदासीनच दिसले. यावरून प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाल्याने या महिन्याच्या सुरुवातीस १ मार्चपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देणारे पत्र दिले, तरीदेखील प्रशासन हलले नाही, त्यामुळे अखेर आजपासून या आंदोलनास सुुरुवात होत आहे.