Kolhapur: चांदेकरवाडीच्या जवानाचे कोलकाता येथे हृदयविकाराने निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 14:08 IST2024-12-09T14:07:35+5:302024-12-09T14:08:50+5:30
कसबा वाळवे : कोलकाता येथे कर्तव्य असलेल्या चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथील जवान संदीप भिकाजी खोत (वय ४२) यांचे शुक्रवारी ...

Kolhapur: चांदेकरवाडीच्या जवानाचे कोलकाता येथे हृदयविकाराने निधन
कसबा वाळवे : कोलकाता येथे कर्तव्य असलेल्या चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथील जवान संदीप भिकाजी खोत (वय ४२) यांचे शुक्रवारी (दि. ६ रोजी) रात्री हृदयविकाराने निधन झाले. आज सोमवारी सकाळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
संदीप हे बारावीनंतर भारतीय सैन्य दलाच्या मद्रास इंजिनीअरिंग रेजिमेंटमध्ये गेली २२ वर्षे कार्यरत होते. तीन वर्षांपूर्वी बढती मिळाल्याने ते कोलकाता येथे हवालदार पदावर सेवेत होते. निवृत्तीसाठी त्यांना दहा महिने शिल्लक होते. शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. संदीप यांचे मोठे भाऊ तानाजी हे सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. संदीप यांचा मुलगा हर्षवर्धन व मुलगी संजीवनी यांना कुस्ती क्षेत्रात यश मिळवावे यासाठी नेहमी प्रोत्साहन दिले.
संदीप यांच्या मृत्यूची बातमी समजताच चांदेकरवाडी गावावर शोककळा पसरली. कोलकात्याहून दिल्ली मार्गे आज रात्री त्यांचे पार्थिव पुणे येथे विमानाने येणार असून सकाळी चांदेकरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. ग्रामपंचायत, माजी सैनिक संघटना व ग्रामस्थांनी अंत्यसंस्कारासाठी सर्व तयारी केली असून मैदानावर चबुतरा उभारला आहे. खोत यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.