चंदगड, गारगोटीला नगरपंचायतीचा दर्जा देऊ : डॉ. रणजित पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 05:26 PM2018-12-18T17:26:32+5:302018-12-18T17:28:42+5:30
चंदगड व गारगोटी ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करीत असल्याचे लेखी आश्वासन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. याबाबत आमदार सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यास डॉ. पाटील यांनी लेखी कळविले आहे.
कोल्हापूर : चंदगड व गारगोटी ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करीत असल्याचे लेखी आश्वासन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. याबाबत आमदार सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यास डॉ. पाटील यांनी लेखी कळविले आहे.
चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा यासाठी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. गारगोटी येथील ग्रामस्थांचीही तशी मागणी आहे; पण सरकार दोन्ही ग्रामस्थांना केवळ खेळवत आहे.
ग्रामस्थांनी सतेज पाटील यांच्याकडेही नगरपंचायत स्थापन होण्याबाबत मागणी केली होती. त्यामुळे औचित्याच्या मुद्द्यावर चर्चा करताना सतेज पाटील यांनी, चंदगड आणि गारगोटी या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा मिळण्याच्या मागणीसाठी विधान परिषदेत १६ जुलै २०१८ रोजी प्रश्न उपस्थित केला होता.
त्याला उत्तर देताना, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी, चंदगड आणि गारगोटी या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
शिवाय चंदगड आणि गारगोटी या ठिकाणी नगरपंचायती स्थापन करण्याबाबत १ मार्च २०१४ रोजी उद्घोषणा निर्गमित केली होती. मात्र ही उद्घोषणा वेळेत प्रसिद्ध झाली नसल्याने पुन्हा २ फेब्रुवारी २०१५ रोजी सुधारित उद्घोषणा प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राज्यभरातील १२३ ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. नगरपंचायती स्थापन झाल्यानंतर त्या ठिकाणच्या नागरिकांना कार्यक्षम, लोकाभिमुख आणि प्रभावी प्रशासन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने त्याचा लाभ झाला अथवा नाही, याचे मूल्यमापन करण्यात येत आहे.
त्यामुळे या मूल्यमापनाच्या अहवालानंतर मंत्रिमंडळाच्या उपसमितीसमोर चंदगड आणि गारगोटी यांचे प्रस्ताव ठेवून निर्णय घेण्याचे आश्वासन राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी दिले आहे.