कोल्हापूर जिल्ह्यात मतदान करण्यात चंदगड, शाहूवाडी मागे; मतदान वाढविण्याचे आव्हान
By समीर देशपांडे | Published: April 30, 2024 12:39 PM2024-04-30T12:39:49+5:302024-04-30T12:40:23+5:30
जिल्ह्यातील ३८७ मतदान केंद्रांवर ६० टक्केपेक्षा कमी मतदान
समीर देशपांडे
कोल्हापूर : लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत चंदगड आणि शाहूवाडी तालुका मतदान करण्यात मागे पडला आहे. या दोन्ही तालुक्यात प्रत्येकी ८५ मतदान केंद्रांवर राज्याच्या सरासरीपेक्षा कमी म्हणजे ६० टक्केपेक्षा कमी मतदान झाले आहे. जिल्ह्यात १० विधानसभा मतदारसंघात एकूण ३८७ मतदान केंद्रांवर याच पद्धतीने कमी मतदान झाले असून ते वाढवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
गेल्यावेळीही मतदान वाढावे यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात त्यावेळी धनंजय महाडिक यांचा पराभव करून संजय मंडलिक विजयी झाले होते. तर हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा पराभव केला होता. कोल्हापूरमध्ये १५ तर हातकणंगले मतदारसंघात १७ उमेदवार रिंगणात होते. महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाची टक्केवारी गतवर्षीपेक्षा घटलेली आहे. त्यामुळे उर्वरित टप्प्यातील निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी सुधारावी यासाठी प्रशासनही प्रयत्न करत आहे.
याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील ६० टक्केपेक्षा ज्या मतदान केंद्रावर मतदान कमी झाले आहे अशा केंद्रांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी ‘आम्ही कमी मतदान केले आहे’ असे फलक लावण्यात येत असून यंदा तरी मोठ्या संख्येने मतदान करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
येथे झाले ६० टक्केपेक्षा कमी मतदान
अ.न | विधानसभा | तालुका | नागरी केंद्रे | ग्रामीण केंद्रे | एकूण |
१ | चंदगड | आजरा | ०० | २० | २० |
गडहिंग्लज | ०० | ४० | ४० | ||
चंदगड | ०१ | २४ | २५ | ||
२ | राधानगरी | राधानगरी | ०० | १९ | १९ |
भुदरगड | ०२ | ११ | १३ | ||
आजरा | ०९ | ०९ | १८ | ||
३ | कागल | कागल | ०० | ०० | ०० |
आजरा | ०० | १३ | १३ | ||
गडहिंग्लज | १६ | ०२ | १८ | ||
४ | कोल्हापूर दक्षिण | कोल्हापूर शहर | २९ | ०० | २९ |
करवीर | ०० | ०५ | ०५ | ||
५ | करवीर | पन्हाळा | ०० | ०८ | ०८ |
गगनबावडा | ०१ | ०९ | १० | ||
करवीर | ०० | ०१ | ०१ | ||
६ | कोल्हापूर | उत्तर | ५६ | ०० | ५६ |
७ | शाहूवाडी | शाहूवाडी | ०० | ८० | ८० |
पन्हाळा | ०० | ०५ | ०५ | ||
८ | हातकणंगले | हातकणंगले | ०० | ०० | ०० |
९ | इचलकरंजी | हातकणंगले | ०९ | ०२ | ११ |
१० | शिरोळ | शिरोळ | १४ | ०२ | १६ |
कागल, हातकणंगलेची बाजी
कागल विधानसभा मतदारसंघात कागल, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील मतदान केंद्रांचा समावेश आहे. संजय मंडलिक हे कागल तालुक्यातीलच असल्याने या तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. हीच परिस्थिती हातकणंगले तालुक्यातील आहे. हातकणंगले तालुक्यातील उमेदवार असलेले धैर्यशील माने रिंगणात होते. त्यामुळे या तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर ६० टक्केपेक्षा अधिक मतदान झाले आहे.
कमी मतदानाची कारणे
- पक्षबदलूपणाला मतदान कंटाळले
- प्रचंड उष्मा
- उमेदवारांबद्दलची नाराजी
- एकूण व्यवस्थेबद्दलची अनास्था
गतवेळच्या मतदानाची स्थिती
कोल्हापूर हातकणंगले
एकूण मतदार १८, ८०.४९६ १७,७६,५५५
पोस्टल मतदान ५,४४४ ५,९५५
एकूण झालेले मतदान १३,३०,८५२ १२,५२,२११