‘लोकमत महामॅरेथॉन’चे चंदगडचा विवेक अन् जतची राणी विजेते

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 01:54 PM2024-01-29T13:54:34+5:302024-01-29T13:54:56+5:30

संभाजीराजे धावले तब्बल दहा किलोमीटर

Chandgad Vivek More and Jat Rani Muchandi won the Lokmat Mahamarathon | ‘लोकमत महामॅरेथॉन’चे चंदगडचा विवेक अन् जतची राणी विजेते

‘लोकमत महामॅरेथॉन’चे चंदगडचा विवेक अन् जतची राणी विजेते

कोल्हापूर : मनाला सुखावणाऱ्या पहाटेच्या गुलाबी थंडीत पारंपरिक ढोल- ताशांचा कडकडाट, सोबतीला लेझीम, पोलिस बँड, शाळकरी मुलींचे नृत्य, आकाशात विविध रंगांची उधळण करणारी आतषबाजी, युवक- युवतींचा जिंकण्यापेक्षा ठरवलेली किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्याची जिद्द अशा अमाप उत्साहात कोल्हापूरचीलोकमत महामॅरेथाॅन’ रविवारी रंगली.

अत्यंत जल्लोषी वातावरणात रंगलेली महामॅरेथाॅन खुल्या गटात पुरुषांमध्ये चंदगडच्या विवेक मोरे याने एक तास सात मिनिटे आठ सेकंद, तर महिलांमध्ये जतच्या राणी मुचंडी हिने एक तास २४ मिनिटे तीन सेकंदांत ही शर्यत जिंकली.

सकाळी सहा वाजता २१ किलोमीटरच्या खुल्या गटातील धावपटूंना मान्यवरांनी फ्लॅग ऑफ केला आणि स्पर्धकांचा ओसंडून वाहणारा लोंढा धावू लागला. ठरावीक वेळेनंतर एकापाठोपाठ एका गटातील स्पर्धा सोडण्यात आली. प्रत्येकवेळी स्पर्धेतील चुरस आणि उत्साह वाढत गेला. अत्यंत नेटके जबरदस्त नियोजन पाहून सहभागी स्पर्धकांसोबत चिअरअप करण्यासाठी आलेले पालक, नातेवाईक मंडळी भारावून गेली. स्पर्धकांना निकोप स्पर्धेचा आणि मनाला ताजगी देणाऱ्या वातावरणाचा वेगळाच अनुभव घेता आला. या स्पर्धेने कोल्हापूरच्या क्रीडानगरीत ‘लोकमत महामॅरेथाॅन’ची एक वेगळी ओळख दृढ केली.

स्पर्धेच्या उद्घाटनास पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, गोकूळचे अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे, माजी अध्यक्ष विश्वास पाटील, वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, ‘लाेकमत’चे संपादक वसंत भोसले, सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख उपस्थित होते.

४ फेब्रुवारीला नागपूरला यायला लागतंय..

राज्यभरात लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित करणारी पुढील महामॅरेथाॅन ४ फेब्रुवारीला नागपुरात, तर १८ फेब्रुवारीला पुणे येथे होणार आहे.

विविध गटांतील निकाल

२१ किलोमीटर (खुला गट- पुरुष) १. विवेक मोरे (एक तास सात मिनिटे आठ सेकंद, २. प्रवीण कांबळे (एक तास सात मिनिटे १६ सेकंद), ३. उत्तम पाटील (एक तास सात मिनिटे ५९ सेकंद).

२१ किलोमीटर (खुला गट- महिला) १. राणी मुचंडी (एक तास २४ मिनिटे तीन सेकंद), २. आकांक्षा शेलार (एक तास २६ मिनिटे ३८ सेकंद), ३. वैष्णवी मोरे (एक तास २६ मिनिटे ४७ सेकंद).

१० किलोमीटर (खुला गट- पुरुष) १. अभिषेक देवकाते (३० मिनिटे ४६ सेकंद), २. प्रधान किरुळकर (३१ मिनिटे ३९ सेकंद), ३. सुहास सावरातकर (३१ मिनिटे ५४ सेकंद).

१० किलोमीटर (खुला गट- महिला) १. साक्षी जडीयाल (३७ मिनिटे ४४ सेकंद), अश्विनी जाधव (३८ मिनिटे तीन सेकंद), ३. निकिता म्हात्रे (३९ मिनिटे ५५ सेकंद).

हाफ मॅरेथाॅन (वेटरन गट- पुरुष) १. भास्कर कांबळे (एक तास १८ मिनिटे ३५ सेकंद), २. पांडुरंग पाटील (एक तास ३० मिनिटे तीन सेकंद), ३. शिवानंद शेट्टी (एक तास ३२ मिनिटे १५ सेकंद).

हाफ मॅरेथाॅन (वेटरन गट- महिला) १. डाॅ. टंडन (एक तास ४५ मिनिटे ५७ सेकंद), २. शितल संघवी (एक तास ५३ मिनिटे ४५ सेकंद), ३. अनिता पाटील (एक तास ५५ मिनिटे ५५ सेकंद).
१० कि.मी. (वेटरन गट- पुरुष) १. आरबीएस. मोनी (३७ मिनिटे ५५ सेकंद), २. जोसेफ इजे (३८ मिनिटे दाेन सेकंद), ३. रमेश चिवलकर (४१ मिनिटे २० सेकंद).

१० कि.मी. (वेटरन गट- महिला) १. पल्लवी मूग (४८ मिनिटे ४१ सेकंद), २. प्रतिभा नाडकर (५२ मिनिटे सहा सेकंद), शिल्पी मंडल (एक तास १५ सेकंद).

हाफ मॅरेथाॅन (नियो वेटरन गट- पुरुष) १. रमेश गवळी (एक तास १२ मिनिटे सहा सेकंद), २. मनोज सिंग (एक तास १७ मिनिटे ५३ सेकंद), ३. परशराम भोई (एक तास २१ मिनिटे चार सेकंद).

हाफ मॅरेथाॅन (नियो वेटरन- महिला) १. ज्योती गावते (एक तास ३० मिनिटे २० सेकंद), २. आसा.पी. (एक तास ३१ मिनिटे ४२ सेकंद), ३. रंजना पवार (एक तास ३९ मिनिटे ४५ सेकंद).
१० कि.मी. (नियो वेटरन गट- पुरुष) १. अक्षय कुमार (३५ मिनिटे १९ सेकंद), २. मल्लिकार्जुन पारडे (३६ मिनिटे २३ सेकंद), ३. किशन कौशिरिया (३६ मिनिटे ४७ सेकंद).

१० कि.मी. (नियो वेटरन गट- महिला) १. बिजुया बर्मन (४५ मिनिटे १५ सेकंद), २. सयोरी दळवी (४६ मिनिटे १५ सेकंद), ३. श्रद्धा काळे (४६ मिनिटे ४३ सेकंद).

हाफ मॅरेथाॅन (डिफेन्स गट- पुरुष ) १. दीपक कुंभार (मराठा इन्फंट्री बटालियन) (एक तास ११ मिनिटे ४४ सेकंद), २. अविनाश पटेल (नाशिक आर्टलरी) (एक तास १२ मिनिटे सात सेकंद). ३. ढाकलू मिटागर (सैन्यदल) (एक तास १६ मिनिटे ५२ सेकंद).

हाफ मॅरेथाॅन (डिफेन्स गट- महिला) १. प्रिती चौधरी (सैन्यदल, भोपाळ) (एक तास २० मिनिटे ५५ सेकंद), २. मीनाताई देसाई (एक तास ३८ मिनिटे आठ सेकंद). ३. प्रियांका पैकरव (एक तास ४० मिनिटे ५४ सेकंद).


नुकतेच १८ जानेवारीला वडिलांचे निधन झाले. त्यांना मी हे पदक अर्पण करीत आहे. कोणत्याही स्पर्धेत जिंकलो की, पहिल्यांदा मी वडिलांना फोनवरून सांगायचो; पण आता ते हयात नसल्यामुळे मन अस्वस्थ झाले. मला जिंकल्याचा आनंद आहेच; पण वडील असते तर अधिक आनंद वाटला असता. मी आंतरराष्ट्रीय पातळीवर जिंकावे अशी त्यांची खूपच इच्छा होती. त्यासाठी मी पुरेपूर मेहनत घेणार आहे. -विवेक मोरे, चंदगड,(२१ किलोमीटर खुला गट - पुरुष)

ठाणे येथील या स्पर्धेत तिसरा क्रमांक, नाशिक येथे दुसरा क्रमांक प्राप्त केला. कोल्हापुरात पहिला क्रमांक पटकाविल्याने खूपच आनंद होत आहे. -राणी मुचंडी, जत, जि. सांगली. (२१ किलोमीटर महिला गट - खुला)

मॅरेथॉनसाठी यांचे योगदान मोलाचेच..

या स्पर्धेसाठी सुंदर बिस्कीटस ॲन्ड नमकीन प्रेझेंटस कोल्हापूर महामॅरेथॉन स्पर्धेस पॉवर्ड बाय आयकॉन स्टील, वारणा मिल्क हे मुख्य प्रायोजक होते. टीशर्ट पार्टनर एमआयटी युनिर्व्हसिटी पुणे, मिल्क पार्टनर गोकूळ दूध संघ, एज्युकेशन पार्टनर संजय घोडावत युनिर्व्हसिटी, स्पोर्ट्सवेअर पार्टनर स्केचर्स, रेस मॅनेंजमेंट पार्टनर रिलॅक्स झील टी पार्टनर सोसायटी टी, फूड पार्टनर आजवा रेस्टॉरंट प्रोटिन पार्टनर मॅक्स प्रोटिन, वॉटर पार्टनर गुडरिच, रिहायड्रेशन पार्टनर इलेक्ट्रो, एनर्जी पार्टनर फूडस्ट्रॉंग, एंटरटेनमेंट पार्टनर रेडिओ मिर्ची, हेल्थ पार्टनर सिद्धिविनायक नर्सिंग होम, आउटडोअर पार्टनर आयलेव्हल ॲडव्हर्टाझिंग, फिजोओ पार्टनर भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजिओथेरपी सांगली, सपोर्टिंग पार्टनर शिवाजी विद्यापीठ, महाराष्ट्र पोलिस यांचे सहकार्य लाभले.

संभाजीराजे धावले तब्बल दहा किलोमीटर

नेहमी अलिशान वाहनातून फिरणारे संभाजीराजे हे धावण्यासाठी ‘लोकमत’ महामॅरेथॉन स्पर्धेत थेट मैदानातच उतरले अन् अनेकांच्या भुवया उंचावल्या. ते इतर धावपटूंसोबत धावण्यासाठी रिंगणात आले. त्यावेळी बघ्यांना ते दहा किलोमीटरचे अंतर पूर्ण करणार नाहीत, असे वाटत होते. मात्र, त्यांनी यशस्वीपणे अंतर पूर्ण केले. त्यानंतर त्यांंनी मैदानात फिरून अनेक धावपटूंची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत मोबाइलवर सेल्फी घेण्यासाठी गर्दी झाली होती. मॅरेथॉनमधील धाव अनेकांनी त्यांच्या लोकसभा निवडणुकीशीही जोडली.

गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी दहा किलोमीटरचे अंतर यशस्वीपणे पूर्ण केले. जिल्हा परिषद सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, करवीरचे सहायक निबंधक प्रेमचंद राठोड, गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड हेही धावले.

रस्त्यावर सळसळता उत्साह

रविवारची पहाट कोल्हापूरकरांसाठी जोश, सळसळता उत्साह घेऊन आली. एरव्ही शांत असणारे रस्ते पहाटे साडेचार वाजल्यापासून खेळाडू, नातेवाईक, क्रीडा रसिकांच्या गर्दीने गजबजून गेले. त्यामुळे पोलिस कवायत मैदानावरील शांतता खेळाडूंच्या लगबगीने, ढाेल-ताशांच्या गजराने भंगली. मैदानावरील चैतन्यमय वातावरण पाहून खेळाडू, त्यांचे नातेवाईक भारावून गेले. ‘बिनधास्त’ धावण्यासाठी सज्ज झाले. प्रत्यक्ष धावण्यापूर्वी खेळाडूंनी गाणी तसेच संगीताच्या ठेक्यावर वॉर्मअप केले.

Web Title: Chandgad Vivek More and Jat Rani Muchandi won the Lokmat Mahamarathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.