कोल्हापुरात ‘चड्डी-बनियन’ गँगचा धुमाकूळ!
By admin | Published: June 1, 2017 01:26 AM2017-06-01T01:26:44+5:302017-06-01T01:26:59+5:30
माळी कॉलनीत रात्रीत पाच घरफोड्या; पोलिसांसमोर आव्हान; नागरिकांत भीतीचे वातावरण
लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. बुधवारी पहाटे टाकाळा परिसरातील माळी कॉलनीत चोरट्यांनी धुमाकूळ सूरज अपार्टमेंट, वसंत व्हिला रो बंगलो, अशोक अपार्टमेंट या तीन अपार्टमेंटमध्ये धाडसी घरफोड्या केल्या. परिसरातील घरांच्या दारांना बाहेरून कड्या घालून चोरट्यांनी पाच फ्लॅट फोडून सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला. घरमालक बाहेरगावी असल्याने नेमका किती मुद्देमाल चोरीस गेला, हे समजू शकले नाही. परिसरातील एका महिलेने ‘चड्डी-बनियन’ घातलेल्या पाच चोरट्यांची गँग परिसरात रात्री पळापळ करताना पाहिल्याचे पोलिसांना सांगितले.या घरफोड्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सूरज अपार्टमेंटमध्ये तीन घरफोड्या
चोरट्यांनी प्रथम माळी कॉलनीतील सूरज अपार्टमेंटला लक्ष्य केले. या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर उमेश सावंत यांच्या मालकीचा फ्लॅट आहे. तो भाड्याने देण्यासाठी रिकामाच होता. चोरट्यांनी या फ्लॅटच्या मुख्य लोखंडी दरवाजाचे ग्रिल व दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला; पण फ्लॅट रिकामाच असल्याने त्यातून चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
तळमजल्यामध्ये अॅड. शिवराज विठ्ठलराव खोराटे यांचे कार्यालय आहे. चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून त्यामध्ये प्रवेश केला. आतील दोन्हीही दरवाजांची कुलपे तोडून लोखंडी तिजोरी फोडली. या तिजोरीतील कागदपत्रे चोरट्यांनी विस्कटली; पण चोरट्यांना याही फ्लॅटमध्ये काहीही चोरीस मिळाले नाही.
‘वसंत व्हिला’तून दागिने
चोरीस गेल्याची शक्यता
माळी कॉलनीतील वसंत व्हिला या रो-बंगलोही चोरट्यांनी फोडला. बंगल्याच्या लोखंडी शटरचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आतील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर चोरट्यांनी आत प्रवेश करून तेथील साहित्य विस्कटले. या बंगल्यातील डॉ. संजय देशपांडे हे सुटीनिमित्त पत्नीसह बाहेरगावी गेले आहेत. यानंतर शेजारी राहणारे बांधकाम व्यावसायिक विकास तारळेकर यांचेही घर चोरट्यांनी फोडले. त्यांच्या घरातील चार कपाटातील तसेच किचन रूम आणि ड्रॉर्इंग रूममधील साहित्य विस्कटले आहे. तारळेकर हे पत्नीसह अमेरिकेला मुलाकडे गेले आहे. त्यामुळे देशपांडे आणि तारळेकर परत आल्याशिवाय चोरट्यांनी काय लंपास केले हे कळू शकणार नाही.
‘अशोक अपार्टमेंट’मधील घरफोडीत चोरटे रिकामेच!
अशोक अपार्टमेंटच्या दोन्हीही प्रवेशद्वारांना लोखंडी शटरचे दरवाजे आहेत. हे दरवाजे सहजासहजी भेदता येत नाहीत; पण चोरट्यांनी या त्यांच्या लोखंडी पट्ट्या वाकवून आतील तळमजल्यावरील वाय. जी. विचारे आणि बी. बी. कुलकर्णी यांच्या फ्लॅटला बाहेरून कड्या लावल्या. त्यानंतर चोरट्यांनी पहिल्या मजल्यावरील चारूशीला शिवराज ननवरे यांच्या फ्लॅटचा लोखंडी दरवाजा तोडला. आतील मुख्य दरवाजातील ‘लॅच की’मध्ये कटावणीची पट्टी टाकून ते लॉक तोडले. आत प्रवेश करून खोलीतील साहित्य विस्कटले. शिवराज ननवरे हे शिवाजी विद्यापीठातील सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. ते या अपार्टमेंटसमोर राहतात.
चोर-चोर पकडा, ‘चड्डी-बनियन’ गँगची शक्यता
सूरज अपार्टमेंटमधील प्रसाद कुलकर्णी यांचे फ्लॅटबाहेर व्हरांड्यात सुकत घातलेले कपडे चोरीस गेले. चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असताना मध्यरात्री दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान रस्त्यावर ‘चोर-चोर’ असे कोणीतरी ओरडल्याचा आवाज आला, म्हणून कुलकर्णी यांच्या पत्नीने खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले असता बनियन व चड्डी तसेच डोक्यावर कापड बांधलेल्या पाच तरुणांची पळापळ सुरू होती. त्यांपैकी तीन तरुण टाकाळा खणीकडे, तर दोन तरुण मुख्य रस्त्याकडे पळाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
शिरगावकर सोसायटीतील चोरीचा तपास ठप्प
माळी कॉलनीशेजारील शिरगावकर सोसायटीत ‘तेजोमय’ बंगल्यातील विजय शंकर नेने हे वृद्ध दाम्पत्य आपल्या मुलाकडे १० दिवसांपूर्वी पुण्याला गेले होते. त्याच दरम्यान, नेने यांच्या घरी घरफोडी झाली. सुदैवाने त्यांनी आपले दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवल्याने पुढील अनर्थ टळला; तर शेजारील पुरुषोत्तम खरे यांच्याही घरी त्याच वेळी घरफोडीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. पण या चोरीसंदर्भात पोलिसांच्या तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही. दोन वर्षापूर्वी नेने यांच्याही घरी झालेल्या घरफोडीत अडीच लाखांचा ऐवज चोरीस गेला होता. आठवड्यापूर्वी याच परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये चोरीचा प्रयत्न झाला. त्यावेळी मध्यरात्रीच्या दरम्यान नागरिकांनी एका महिला चोरट्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले; पण त्याबाबत पोलिसांकडून पुढे काहीच तपास झाला नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
पोलीस सुस्त; चोरटे मस्त
गेल्या अडीच महिन्यांत कोल्हापूर शहरात ४० हून अधिक घरफोड्या झाल्या. त्यामध्ये सुमारे पाऊण लाखाहून अधिक रकमेचा ऐवज लंपास झाल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यांत आहे. शहरात राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा अशी चार पोलीस ठाणी आहेत. पण रात्रीपाठोपाठ दिवसाही घरफोड्या, चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सुट्टीच्या वेळी बाहेरगावी गेलेल्या नागरिकांची घरे हेरून या घरफोड्या पाठोपाठ होत आहेत. या चोरट्यांचा माग काढणे दूरच कोणताही संशयाचा दुवाही पोलिसांच्या हाती लागलेला नाही यामुळे पोलीसच आता चोरट्यांपुढे हतबल झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनाच आता स्वत:च्या घरांच्या संरक्षणासाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
घरफोड्यांची पोलीस दप्तरी नोंदच नाही
टाकाळा चौकातील माळी कॉलनीत झालेल्या पाच घरफोड्यांच्या प्रकारानंतर घटनास्थळी काही पोलीस व कनिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या; मात्र घटनास्थळी वरिष्ठ दर्जाच्या एकाही अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची ही अनास्था पोलिसांचे मनोधैर्य खचवू शकते. पाच घरफोड्याबाबत रात्री उशिरापर्यंत राजारामपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रारही दाखल झाली नाव्हती.
वर्दी पहाटे, पोलीस आले सकाळी
पहाटेदरम्यान घरफोडीच्या घटना घडल्याची खबर परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलीस ठाण्यात कळविली; पण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट न देता सकाळी येऊन, मोजकीच माहिती घेतली आणि या घटनेची गांभीर्याने दखलच घेतली नाही. यामुळे परिसरातील नागरिकांतून संताप व्यक्त होत होता.