चांदोली धरण ५० टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:17 AM2021-06-21T04:17:06+5:302021-06-21T04:17:06+5:30
सतीश नांगरे लोकमत न्यूज नेटवर्क शित्तूर-वारूण : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून चांदोली धरणक्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या ...
सतीश नांगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
शित्तूर-वारूण :
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून चांदोली धरणक्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने आज चांदोली धरण यावर्षी पहिल्यांदाच जून महिन्यामध्ये ५०.६६ टक्के भरले आहे. ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या धरणात आजपर्यंत १७.४३ टीएमसी साठा झाला असून, धरणाची पाणीपातळी ६०६.७५ मीटर इतकी झाली आहे.
सध्या धरणातून १ हजार ६०७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सुरू आहे.
चांदोली धरणातून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वारणा डावा व उजवा कालवा, वाकुर्डे योजना व वारणा नदीत पाणी सोडले जाते. त्यामुळे वारणा धरण पूर्ण भरण्याकडे लोकांचे लक्ष लागून राहिलेले असते. निर्धारित क्षमतेपर्यंत पाणी साठा झाल्यानंतरच वारणा नदीमध्ये धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू केला जातो. परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. गेल्या चोवीस तासांत ३८ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे, तर आजअखेर एकूण ४५२ मिलिमीटर पावसाची नोंद पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे. पाणलोट क्षेत्रातून धरणामध्ये ७ हजार ६८१ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. सध्या धरणाची पाणीपातळी ६०६.७५ मीटर असून, पाणीसाठा ४९३.४८ द. ल. घ. मी. इतका म्हणजे १७.४३ टीएमसी इतका झाला आहे.
फोटोः २० चांदोली
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पहिल्यांदाच जून महिन्यात धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.