चांदोली धरण परिसर हादरला; सांगलीला भूकंपाचा सौम्य धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 10:18 AM2023-08-16T10:18:23+5:302023-08-16T10:18:49+5:30
वारणावती भूकंप मापक यंत्रावर याची नोंद झाली आहे. हा सौम्य प्रकारचा भूकंप असून तो फक्त वारणावती आणि धरण परिसरातच जाणवला.
- संदीप आडनाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर/ सांगली : कोल्हापूर शहरापासून ७६ किमी अंतरावर चांदोली धरण आणि अभयारण्य परिसरात बुधवार, दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी ३.४ रिश्टर स्केल इतक्या क्षमतेचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे.
वारणावती भूकंप मापक यंत्रावर याची नोंद झाली आहे. हा सौम्य प्रकारचा भूकंप असून तो फक्त वारणावती आणि धरण परिसरातच जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू चांदोली धरणाजवळ होता. चांदोली धरणाच्या सुरक्षिततेला भूकंपाचा कोणताही धोका नसल्याचे सहाय्यक अभियंता (वर्ग एक) मिलिंद किटवाडकर यांनी सांगितले आहे. कोल्हापूरपासून १७.१९ अक्षांशावर याची नोंद झाली असून याची खोली जमिनीखाली ५ किलोमीटर होती. जागतिक प्रमाणवेळेनुसार १ वाजून ५ मिनिटे आणि ७.५ सेकंदाने या भूकंपाची नोंद झाली आहे. या केंद्रावर डिजिटल भूकंपमापक उपकरणाला मंजुरी मिळाली आहे, लवकरच ते या ठिकाणी बसविले जाईल, अशी माहिती किटवाडकर यांनी दिली.
सकाळी ६:३५ वाजता ३.२ रिस्टर स्केल चा भूकंप झाला.हा भूकंप साडेसात सेकंद जाणवला असून त्याचा केंद्रबिंदू चांदोली धरणा पासून १५.२ किलोमीटर वर होता. यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही तसेच चांदोली धरणास कोणताही धोका झालेला नाही.अशी माहिती शाखाधिकारी गोरख पाटील यांनी दिली.
कोल्हापुरात जाणवला नाही धक्का
या भूकंपाची नोंद चांदोली धरणाजवळ झाली असली तरी कोल्हापुरात याची जाणीव झाली नाही. कोणत्याही प्रकारची हानी या भूकंपामुळे झालेली नाही आणि कोल्हापूर जिल्ह्यात भूकंपाची कोणतीही नोंद झाली नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.