चांदोलीत बनावट प्रकल्पग्रस्तांना रोखले

By admin | Published: July 31, 2016 12:50 AM2016-07-31T00:50:07+5:302016-07-31T00:50:07+5:30

जमीन संपादनाचा डाव उधळला : महामार्गावरच घेराव; गावात पुन्हा न येण्याचा इशारा

Chandolit stopped fake project affected people | चांदोलीत बनावट प्रकल्पग्रस्तांना रोखले

चांदोलीत बनावट प्रकल्पग्रस्तांना रोखले

Next

 आंबा : चांदोली (ता. शाहूवाडी) येथे जमीन संपादनास आलेल्या महसूल अधिकाऱ्यांसह बनावट प्रकल्पग्रस्त खातेदारांना ग्रामस्थांनी महामार्गावरच घेराव घालून सायंकाळपर्यंत रोखले. काठ्या व रॉकेल घेऊन आकस्मिक आलेला ग्रामस्थांचा जमाव पाहून संपादनास आलेल्या मंडळींनी काढता पाय घेतला. मात्र, धावत्या गाडीला महिला सामोऱ्या होऊन बनावट खातेदारांना जाब विचारत गावात पुन्हा पाय ठेवला तर खुब्यातून काढू, अशी धमकी देत महसूल अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
दुपारी एक वाजता जिल्हा पुनर्वसन विभागाचे भूमापक संदीप पाटील, मंडल अधिकारी एस. ए. गावित, तलाठी एम. एस. उपाध्ये अन्य चार खातेदारांना घेऊन पांडुरंग शिंदे यांची गट नं. १६६ मधील ४० व ३८ गुंठे, तर दिलीप शिंदे यांची गट नं. २२२ मधील ३८ गुंठे जमीन संपादनास दाखल झाले. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अण्णा मारुती सुतार, शामराव आवजी पाटील व दत्तू मारुती सुतार (रा. सर्व कोडोली ) या वारणा प्रकल्पग्रस्तांना जिल्हाधिकारी यांचे नावे वर्ग केलेली ही जमीन शनिवारी संपादित होणार होती. मात्र, प्रत्यक्षात आदेशावरचे खातेदार नसल्याचे समजताच ग्रामस्थांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माजी सरपंच आनंदा पाटील व उपसरपंच सुनीता कुंभार यांनी मध्यस्थी करून ग्रामस्थांना शांत केले व अधिकाऱ्यांना शेतातून ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन ग्रामस्थांच्या बैठकीत जाब विचारला.
यावेळी अधिकाऱ्यांसोबत आलेल्या कोडोली परिसरातील रणजित पाटील, शिवाजी पाटील, प्रवीण कोल्ले, सुरेश चौगुले ही मंडळी जमीन संपादनास कशी आली हे विचारता संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचा व माझा काही संबंध नसल्याचे सांगितले, तर संबंधित चौघांनी आम्ही भूमापक संदीप पाटील यांच्यासोबत आल्याचे आंदोलनकर्त्या महिलांना सांगितले. त्यामुळे बनावट खातेदारांबरोबर भूमापकही व आदेशही बनावट असल्याची शंका घेऊन संपादनास आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीत पुन्हा रोखले. जिल्हाधिकारी आल्याशिवाय तुम्ही येथून हलायचे नाही, असा पवित्रा महिला आंदोलकांनी घेतला. दरम्यान, शाहूवाडीचे नायब तहसीलदार यांना बोलावण्याचा आग्रह नामदेव पाटील व संदीप पाटील यांनी धरला, पण साहेब बैठकीमध्ये असल्याचा मेसेज गावित यांनी ग्रामस्थांना दाखवून वेळ मारून नेली. (वार्ताहर)
आत्मदहनाचा प्रयत्न
संपादनास आलेल्या बोगस खातेदारांना पोलिसांत देण्याची मागणी सदस्य नामदेव पाटील यांनी केली, तर लक्ष्मी शिंदे हिने चक्क रॉकेल भरलेला डबा घेऊन बोगस खातेदारांच्या गाडीपुढे येऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, महिलांनी तिला रोखले. हे गाव भूसंपादनातून वगळले नाही तर तेरा शेतकरी आत्मदहन करणार असल्याचा इशारा माजी सरपंच आनंदा पाटील यांनी यावेळी दिला. मंडल अधिकारी यांनी ग्रामस्थांच्या लेखी मागणीनुसार संपादनाची कारवाई थांबवण्यात येत असल्याचे जाहीर केले व त्यानंतर ग्रामस्थांनी रोखलेल्या मंडळींची सुटका केली.

Web Title: Chandolit stopped fake project affected people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.