चंद्रदीप नरके दहा दिवस तळ ठोकून -: ‘एनडीआरएफ’ टीमच्या पुढे यंत्रणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 08:34 PM2019-08-14T20:34:00+5:302019-08-14T20:36:32+5:30
१0 दिवस घरदार सोडून तिथेच पूरग्रस्तांसोबतच मिळेल ते खाऊन, नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घातला; पण ते मागे हटले नाहीत.
कोल्हापूर : महापुराच्या संकटातून नागरिकांना मदत करणारे अनेक हात असले, तरी स्वत:च्या जीवाची परवा न करता, गेली १0 दिवस आंबेवाडी, चिखली परिसरातील पूरग्रस्तांसाठी अहोरात्र आमदार चंद्रदीप नरके यांनी काम केले. शेवटच्या व्यक्तीला स्थलांतरित करेपर्यंत ते धडपडत होते. १0 दिवस घरदार सोडून तिथेच पूरग्रस्तांसोबतच मिळेल ते खाऊन, नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घातला; पण ते मागे हटले नाहीत.
या गावांत पुराचे पाणी वाढत असताना, तेथील नागरिकांना सतर्क करत त्यांना हलविण्याची यंत्रणा सक्रिय केली; पण पाणी वेगाने वाढत गेल्याने सगळीकडे हाहाकार माजला आणि दोन हजार लोकांचा जीव धोक्यात आला. ‘एनडीआरएफ’ची टीम येईपर्यंत खासगी बोटीत बसून त्यांनी माणसांना सोनतळी येथे हलविण्यास सुरुवात केली. अंगात टी शर्ट, हाफ पँट घालून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पुराच्या पाण्यात उतरून प्रत्येक माणसाला सुरक्षितस्थळी नेण्यासाठी त्यांची धडपड असायची.
पाण्यात साप, विंचू अंगाला स्पर्श करायचे; पण पूरग्रस्तांचा जीव वाचविण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वाही त्यांनी केली नाही. जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, इंद्रजित पाटील, सरदार मिसाळ आदींच्या टीमच्या मदतीने त्यांनी पेशंट, लहान मुले, वयोवृद्धांना, प्रसंगी स्वत:च्या खांद्यावर घेऊन बाहेर काढले. ‘एनडीआरएफ’च्या टीमला मागे टाकत त्यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने राबविलेली यंत्रणा निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या प्रयत्नांची मंत्री एकनाथ शिंंदे यांच्यासमोर जवानांनी प्रशंसा केली.