सभेत घुसणारे ‘चंद्रदीप’च ‘हिरो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:54 AM2018-10-01T00:54:13+5:302018-10-01T00:54:18+5:30
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या विरोधी गटाचे नेतृत्व आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांनी केले असले, तरी रविवारी झालेल्या वादळी सभेचे हिरो मात्र आमदार चंद्रदीप नरकेच झाले. सभागृहात आत सोडण्यापासून ते सभास्थळी धाडसाने घुसण्यापर्यंत नरके यांनी आक्रमक भूमिका घेतली. सभामंडपात त्यांना कोण रोखू शकले नाही.
वॉटर पार्क येथून दोन हजार कार्यकर्त्यांसह विरोधक ताराबाई पार्क येथील सभास्थळी आले. विरोधक येण्यापूर्वीच सभामंडप हाऊसफुल्ल झाल्याने विरोधी नेते आक्रमक झाले होते. त्यांनी आम्हाला बसण्यासाठी जागा द्या, अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली, पोलीस अधिकारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने सर्वच नेते आक्रमक झाले; पण सगळ्या नेत्यांत आमदार नरके फारच आक्रमक झाले होते. गेटवर घेतलेल्या सभेतही त्यांनी सत्तारूढ गटाच्या नेत्यांसह संचालकांचे वाभाडे काढले. त्यानंतर आत सोडण्यासाठी इतर नेत्यांबरोबरच नरके यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पोलिसांना न जुमानताच आत प्रवेश केला आणि थेट सभास्थळ गाठले. हजारांचा मॉब असल्याने त्यात घुसणे तसे जोखमीचे होते; पण आक्रमक नरके त्यांच्यापाठोपाठ हसन मुश्रीफ, सतेज पाटील, संजय मंडलिक, के. पी. पाटील हे सभेत घुसल्याने कमालीचा तणाव निर्माण झाला. नरके यांचे स्वीय सहायक युवराज माने सर्वांत पुढे होते. त्यांच्यापाठोपाठ आमदार नरके, अजित नरके पुढे आले. नेत्यांनी व्यासपीठाकडे आगेकूच सुरू केल्याने तणाव वाढत गेला. या गोंधळातच नरके आक्रमक झाले. व्यासपीठावरून अध्यक्ष पाटील माईकवरून मंजूर मंजूर म्हणत होते. त्यास प्रत्युत्तर म्हणून कार्यकर्त्यांनी आमदार नरके यांना खांद्यावर उचलून घेतल्याने ना मंजूर... ना मंजूर... करत घोषणा देण्यास सुरुवात केली. ‘गोकुळ’ विरोधातील लढाईचे सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांनी नेतृत्व केले असले तरी रविवारच्या सभेत चंद्रदीप नरकेच हिरो ठरले अशी चर्चा सभास्थळी होती.
नरके आक्रमक का झाले?
चंद्रदीप नरके यांच्या आक्रमतेमागे करवीर मतदारसंघातील राजकारण होते. हे जरी खरे असले तरी सभेच्या ठिकाणी करवीर, पन्हाळा, शाहूवाडीतील ठरावधारक संख्येने जास्त होते. ते नरके व त्यांचे बंधू अजित नरके यांनाही मानणारे असल्याने अनेक सभासदांनी त्यांना वाट करून दिली. त्यांच्याऐवजी अन्य दुसरे नेते असते तर कदाचित विरोध झाला असता. शिवाय नरके आमदार असल्याने त्यांना थांबा म्हणणे पोलिसांनाही शक्य झाले नाही.
हाच्च्या राखू नका, घुसा
पोलिसांनी रोखल्याने आत
जायचे की नाही? या मन:स्थितीत विरोधी नेते होते; पण सभास्थळाच्या ठिकाणी जाणे गरजेचे असल्याचे सांगत आमदार नरके यांनी आत जाण्याचा आग्रह धरला. हाच्च्या राखू नका, घुसा, अशी हाक देत नरके पहिल्यांदा आत घुसले.
मोट बांधली... : मल्टिस्टेटसह एकूणच कारभाराला आमदार सतेज पाटील यांनी विरोध दर्शवत ‘गोकुळ’ विरोधात रणशिंग फुंकले. सुरुवातीला ते एकाकी झुंज देतील असेच वातावरण होते, त्यानंतर खासदार राजू शेट्टी, आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, के. पी. पाटील, आमदार उल्हास पाटील यांनी पाठबळ दिल्याने सतेज पाटील यांचा आत्मविश्वास वाढला. या सगळ्याच नेत्यांनी ‘गोकुळ’ विरोधात रान उठवल्याने कमालीची वातावरण निर्मिती झाली होती; त्यामुळे सभा वादळी होणार हे निश्चित होते, घडलेही तसेच.