‘गोकुळ’ला चंद्रदीप नरके गट दोन जागांसाठी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:20 AM2021-04-03T04:20:22+5:302021-04-03T04:20:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गोकुळ मल्टिस्टेटच्या लढ्यात माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी अग्रभागी राहून सगळ्यांना अंगावर घेतले, त्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गोकुळ मल्टिस्टेटच्या लढ्यात माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी अग्रभागी राहून सगळ्यांना अंगावर घेतले, त्याची झळ विधानसभा निवडणुकीत बसली आणि आता एका जागेवर बोळवण करणार असाल तर चालणार नाही. अजित नरकेंसह करवीरमध्ये एक जागा द्या; अन्यथा मार्ग मोकळा असल्याचा इशारा माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटाने शुक्रवारी बैठकीत दिला.
गोकुळ जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी चंद्रदीप नरके गटाची अमृतसिद्धी मल्टिपर्पज हॉलमध्ये बैठक झाली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर शिष्टमंडळाने शासकीय विश्रामगृहात जाऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन दुसऱ्या जागेची मागणी केली.
करवीर व पन्हाळा तालुक्यांतील ठरावांची संख्या आपणासमोर आहे. सत्ताधारी पॅनेलमध्ये आमचे प्रतिस्पर्धी पी. एन. पाटील हे चार जागा घेऊन रिंगणात येणार आहेत. मग येथे आम्हाला एकही जागा देणार नसाल तर, हा अन्याय असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य एस. आर. पाटील यांनी सांगितले.
‘कुंभी’चे संचालक विलास पाटील म्हणाले, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या स्टुडंट कौन्सिलच्या निवडणुकीपासून चंद्रदीप नरके यांची साथ आहे. जिल्हा बँक, विधान परिषदेत पाठीशी राहिले. गोकुळ मल्टिस्टेटच्या लढाईत चुलते अरुण नरकेंसह सगळ्यांना अंगावर घेतले. त्याचा एकत्रित परिणाम विधानसभेला भोवला. एका कर्तबगार नेत्याला ‘माजी आमदार’ म्हणताना मनाला वेदना होतात.
प्रत्येक निवडणुकीत तुमच्यासोबत राहून ताकद देण्याचे काम चंद्रदीप नरके यांनी केले. आता त्यांना ताकद द्यायची वेळ आली असताना, वापरून फेकून देणार असाल तर चालणार नाही. करवीरमध्ये मोकळा संघर्ष करणार नसल्याचा इशारा प्रकाश पाटील कोगेकर यांनी दिला.
यावेळी, पुंडलिक पाटील, बबन पाटील, आदी मनोगत व्यक्त केले. ‘कुंभी’चे उपाध्यक्ष निवास वातकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, किशोर पाटील, रवींद्र मडके, आदी उपस्थित होते.
कोरे, आबिटकरांना दोन मग आम्हाला का नाही?
आमदार विनय कोरे, प्रकाश आबिटकरांना दोन-दोन जागा देता; मग चंद्रदीप नरकेंना का नाही? असा सवाल रवी चौगुले यांनी केला.