चंद्रकांत बोंद्रे यांचे निधन
By admin | Published: September 12, 2015 12:47 AM2015-09-12T00:47:41+5:302015-09-12T00:50:02+5:30
सोमवारी सर्वपक्षीय शोकसभा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)चे संचालक, श्री शाहू शिक्षण संस्थेचे सचिव चंद्रकांत ऊर्फ सुभाष श्रीपतराव बोंद्रे (वय ६९) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले. मध्यरात्री दोनच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेताना गाडीतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सुसंस्कृत व शालीन नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त झाली. दिवंगत माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांचे ते ज्येष्ठ सुपुत्र होत. त्यांच्या पश्चात पत्नी कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या संचालिका रमा, मुलगा अभिषेक, आई मालती, भाऊ विजय, रणजित बोंद्रे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (दि. १४) सकाळी नऊ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत आहे.त्यांना हदयविकाराचा त्रास नव्हता. नियमित व्यायाम व आदबशीर राहणीमान यामुळे प्रकृती चांगली होती.त्यामुळे त्यांच्या अशा अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला. दोन दिवसांपूर्वी मुंबईवरून आल्यानंतर बोंद्रे यांनी सर्दी व अंगदुखीचा त्रास झाल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेतले. गुरुवारी दिवसभर ते दैनंदिन कामात व्यस्त राहिले. रात्री जेवण करून दहानंतर ते अंबाई टँक येथील ‘हॅपी होम’ निवासस्थानी झोपी गेले. मध्यरात्री दोन वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागले. घराबाहेर येऊन थोडा वेळ मोकळ््या हवेत थांबले. श्वास घेण्यास जास्तच त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले, पण गाडीतून नेतानाच त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या निधनाचे वृत पहाटेच कोल्हापूरसह करवीर तालुक्यात वाऱ्यासारखे पसरले. ते वृत्त ऐकून अनेकांना धक्का बसला. सोशल मीडियावरूनही बातमी पसरल्यानंतर सकाळी सहा वाजल्यापासूनच त्यांच्या निवासस्थानी गर्दी झाली. सकाळी सात वाजता त्यांचे पार्थिव रुग्णालयातून निवासस्थानी आणण्यात आले. त्यानंतर आठ वाजता दसरा चौकातील शाहू शिक्षण संस्थेमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. नऊ वाजता त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रेस प्रारंभ झाला. आमदार चंद्रदीप नरके, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह हजारो बोंद्रेप्रेमी कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी झाले. बोंद्रे हे वारकरी संप्रदायातील असल्याने टाळ-मृदंग व भजन म्हणत अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रा दुपारी पावणेबारा वाजता पंचगंगा स्मशानभूमीत आली. मुलगा अभिषेक यांनी त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार महादेवराव महाडिक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, माजी महापौर भिकशेठ पाटील, प्रल्हाद चव्हाण, आर. के. पोवार, नंदकुमार वळंजू, राष्ट्रवादीचे ए. वाय. पाटील, राजू लाटकर, भाजपचे महेश जाधव, जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने, व्ही. बी. पाटील, मानसिंगराव गायकवाड, कर्णसिंह गायकवाड, नगरसेवक शारंगधर देशमुख, परिक्षीत पन्हाळकर, इंद्रजित बोंद्रे, प्रा. जयंत आसगांवकर, अजित राऊत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामचंद्र गुरव, नानासाहेब गाठ, उपाध्यक्ष शशिकांत खोत, करवीरचे माजी सभापती पी. डी. पाटील, बाबासाहेब पाटील-भुयेकर, मधुकर जांभळे, अरुण नरके, बाबा देसाई, अरुण डोंगळे, उदय पाटील, विश्वास जाधव, बाळासाहेब खाडे, राजेश नरसिंग पाटील, अभिजित पाटील, रामराजे कुपेकर, अंबरिश घाटगे, अजित नरके, विजय औताडे, राजेश पाटील-सडोलीकर, ‘कुंभी’चे उपाध्यक्ष शामराव गोधडे, बाजार समितीचे उपसभापती विलास साठे, बाबासाहेब देवकर यांच्यासह ‘कुंभी’, ‘भोगावती’ साखर कारखाना, ‘गोकुळ’चे आजी-माजी संचालक, जिल्ह्यातील विविध सहकारी संस्था, शिक्षण व क्रीडाक्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
सोमवारी सर्वपक्षीय शोकसभा
सोमवारी (दि. १४) दुपारी चार वाजता दसरा चौकातील शाहू शिक्षण संस्थेत सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
निकराची झुंज देत ‘गोकुळ’मध्ये संधी
चंद्रकांत बोद्रे यांनी ‘गोकुळ’मध्ये दहा वर्षे प्रतिनिधित्व केले. मागील निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला; पण ते थांबले नाहीत. दूध संस्थांशी असणारे नाते कायम ठेवत त्यांनी यावेळेला विरोधी पॅनेलमधून निवडणूक लढविली आणि चांगली मते घेऊन सन्मानाने पुन्हा ‘गोकुळ’मध्ये प्रवेश केला; पण हा कालावधी अवघ्या पाच महिन्यांचाच राहिल्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
‘गोकुळ’ला चौथा झटका
गेल्या दोन वर्षांत ‘गोकुळ’ दूध संघाचे चार विद्यमान संचालकांचे मृत्यू झाले. यामध्ये आनंदराव पाटील-चुयेकर व राजकुमार हत्तरकी यांचे आकस्मिक, तर सुरेश पाटील यांचे मे महिन्यात अपघाती निधन झाले. त्यांच्यानंतर चंद्रकांत बोंद्रे यांचे आकस्मिक निधन झाल्याने ‘गोकुळ’ला दोन वर्षांत चौथा झटका बसल्याची चर्चा स्मशानभूमीत सुरू होती.
पापांच्या मृत्यूनंतर...
चंद्रकांत यांच्या आईचे लहानपणीच निधन झाले. त्यामुळे दिवंगत महिपतराव बोंद्रे ऊर्फ पापा यांनी त्यांना मायेची ऊब दिली. बोंद्रे यांना राजाराम कॉलेजला जाण्यासाठी १९७२ मध्ये पापांनी हौसेने फियाट गाडी घेऊन दिली होती. पापा हा त्यांचा मोठा मानसिक आधार होता; परंतु काही महिन्यांपूर्वी त्यांचेही निधन झाल्यावर चंद्रकांत मानसिकदृष्ट्या थोडे खचले होते.
स्वच्छ चारित्र्याचा नेता
स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रेदादा यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचे काम चंद्रकांत बोंद्रे यांनी केले. स्वच्छ चारित्र्य व अभ्यासू व्यक्तिमत्त्व गेल्याने निश्चितच कोल्हापूरच्या राजकारणात पोकळी निर्माण झाल्याची भावना खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली.
Þअल्पपरिचय
चंद्रकांत श्रीपतराव बोंद्रे
जन्म : १८ मे १९४७, वय ६९
शिक्षण : बी.ए., एम.बी.ए.
कौटुंबिक माहिती : पत्नी सौ. रमा चंद्रकांत बोंद्रे
मुलगा : अभिषेक बोंद्रे
पदे : सचिव : श्री शाहू शिक्षण संस्था, कोल्हापूर
चेअरमन : विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था, फुलेवाडी
संचालक : कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ (गोकुळ)
चेअरमन : कोल्हापूर सेंट्रल को. आॅफ कंझ्युमर्स स्टोअर्स लि.
विशेष नोंदी
‘गोकुळ’ संचालक या नात्याने ‘करवीर श्री’ व ‘आदर्श माता’ स्पर्धेचे आयोजन
लोककलांचे संवर्धन या हेतूने ‘झिम्मा-फुगडी’ स्पर्धेचे आयोजन
४ थी व ७ वी स्कॉलरशिप उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव
मान्यवरांची व्याख्यानमाला दर पौर्णिमेला
तोट्यात असणारी कंझ्युमर्स ही संस्था नफ्यात आणली.
शैक्षणिक स्तरावर सहविचार सभांचे आयोजन
उत्कृष्ट प्रशासक पुरस्काराने सन्मान
१९९९ साली विधानसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार
आनंद, गुजरात येथे दुग्ध व्यवसायासंदर्भातील कोर्स पूर्ण केला.