चंद्रकांतदादा, खाडेंवरील खटला मागे
By Admin | Published: July 5, 2017 12:17 AM2017-07-05T00:17:40+5:302017-07-05T00:17:40+5:30
चंद्रकांतदादा, खाडेंवरील खटला मागे
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरज दंगलप्रकरणी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आ. सुरेश खाडे, भाजपचे प्रदेश सचिव मकरंद देशपांडे, माजी जिल्हाध्यक्ष रमेश भाकरे, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, हणमंत पवार, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग पाटील यांच्यासह ५१ जणांविरुद्ध न्यायालयात दाखल करण्यात आलेला खटला शासनाने मागे घेतला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मिरज न्यायालयात गृह विभागाचा खटला मागे घेण्यात आल्याचे पत्र सादर करून, या निर्णयाबद्दल पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
मिरजेत २००९ मध्ये गणेशोत्सवात पोस्टरच्या वादातून झालेल्या दोन गटांतील दंगलीप्रसंगी जमावाने ब्राह्मणपुरीतील गजानन मंगल कार्यालयापासून पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला होता. पोलिसांनी श्रीकांत चौकात जमावाला रोखल्यानंतर, जमावाने पोलिसांवर दगडफेक करून रस्त्यावर टायर पेटविल्या होत्या. पोलीस वाहनासह (एमएच-१०-एन ७०५) श्रीकांत चौकातील हॉटेल्स व दुकानांवर दगडफेक करून ५० ते ६० हजारांचे नुकसान व पोलीस कर्मचाऱ्यांना जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी तत्कालीन आमदार चंद्रकांतदादा पाटील, आ. सुरेश खाडे, मकरंद देशपांडे, हणमंत पवार, ओंकार शुक्ल, पांडुरंग कोरे, अरविंद लोहार, तानाजी घारगे, गणेश पलसे, अभय सहस्रबुध्दे, अरविंद देशपांडे, महेश सहस्रबुध्दे, सौ. प्राची पाठक, दिलीप पाटील, संगीता पाटील, कुसूम पवार यांच्यासह सुमारे ५१ भाजप, शिवसेना कार्यकर्त्यांवर मिरज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याच्या सुनावणीप्रसंगी संशयितांचे वकील वासुदेव ठाणेदार यांनी, शासनाने हा खटला मागे घेतल्याचे पत्र मंगळवारी हजर केल्यानंतर न्यायालयाने सुनावणी रद्द केली.
अन्य खटल्यांचा अद्याप निर्णय नाही
मिरज दंगलप्रकरणी पोलिसांनी ३७ गुन्हे दाखल करून दोन्ही गटांच्या सुमारे ६०० जणांना अटक केली होती. दंगलप्रकरणी सर्व संशयितांविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. दंगलीत निरपराध तरुणांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याची मागणी आ. सुरेश खाडे यांनी शासनाकडे केली होती. मात्र, आ. खाडे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे संशयित असलेला दंगलीचा एकच खटला शासनाने मागे घेतला आहे. दंगलप्रकरणी पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलेल्या अन्य खटल्यांची सुनावणी रखडल्याने त्यांचा अद्याप निर्णय झालेला नाही.