चंद्रकांतदादा यांच्याकडे एवढे पैसे येतात कुठून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:04 AM2017-10-23T01:04:28+5:302017-10-23T01:04:28+5:30

 Chandrakant Dada has so much money from where? | चंद्रकांतदादा यांच्याकडे एवढे पैसे येतात कुठून?

चंद्रकांतदादा यांच्याकडे एवढे पैसे येतात कुठून?

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गेल्या अनेक महिन्यांत सणसमारंभावेळी जबरदस्ती करीत गप्प बसण्यासाठी अनेकांना ‘आत टाकण्या’ची भाषा वापरली. त्यानंतर त्याच तरुण मंडळांना लाखो रुपये वाटप केले आहेत. त्यांच्याकडे एवढ्या अल्पावधीत एवढे रुपये आले कोठून असा सवाल करत याबाबत पालकमंत्र्यांची ‘ईडी’ अर्थात सक्त अंमलबजावणी खात्यातर्फे चौकशी करावी, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.
स्वर्गीय डॉ. विश्वनाथ गायकवाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवसेनेतर्फे रविवारी सकाळी केशवराव भोसले नाट्यगृहात महिलांना हेल्मेट वाटप कार्यक्रमप्रसंगी संयोजक म्हणून ते बोलत होते. आमदार क्षीरसागर म्हणाले, मीही त्यांच्याबरोबरीने दोन टर्म आमदार आहे. मात्र, त्यांनी मंत्रिमंडळात स्थान पटकाविले. त्यानंतर लाखो, कोटींची उड्डाणे घेतली. गणेशोत्सवाच्या काळात अनेक तरुण मंडळे व तालमींच्या कार्यकर्त्यांना साउंड सिस्टीम लावू नका; नाहीतर चार-चार दिवस आत टाकीन. दिवाळीत फटाके फोडू नका; अन्यथा कारवाई करू, अशी जणू दादागिरीच सुरू केली आहे. प्रत्येकाला पदे देण्याची आणि प्रत्येकाला पैशांमध्ये खरेदी करण्याची भाषा ते बोलत आहेत. त्यांचे असे बोलणे म्हणजे ते राज्याचे ट्रस्टी किंवा मालक असल्यासारखे वागत आहेत. मीही दोन वेळा आमदार झालो. तेही माझ्याबरोबरीने दोन्ही वेळेला आमदार म्हणून विधान परिषदेत निवडून आले. त्यांच्याकडे त्यावेळी इतकी संपत्ती नव्हती. मात्र, गेल्या दोन वर्षांत त्यांनी मोठीच प्रगती केली आहे. एवढे मोठे धन त्यांच्याकडे कोठून आले समजत नाही; त्यामुळे त्यांची ‘ईडी’कडून चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
प्रथम मीही हेल्मेटला विरोध केला; कारण शाहूनगरीतील जनता कोणाचीही जोरजबरदस्ती ऐकून घेत नाही. त्यांच्यामध्ये जनजागृती करणे प्रशासनाचे काम होते; पण जबरदस्ती केल्याने मीही जनतेच्या बाजूने उभा राहिलोे. मात्र, मलाही कळते की, मनुष्याचे जीवन किती महत्त्वाचे आहे. त्यामुळेच मी व जितेंद्र गायकवाड यांच्या सहकार्याने शहरातील एक हजार महिलांना हेल्मेट वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले
यावेळी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, युवा सेना राज्य उपाध्यक्ष पवन जाधव, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, परिवहन समितीचे सभापती नियाज खान, दिगंबर फराकटे, माजी महापौर मारुतीराव कातवरे, माजी उपमहापौर उदय पोवार, जितेंद्र गायकवाड, हर्षल सुर्वे, आदी उपस्थित होते.
-------
पदाची अपेक्षा नाही- सुनील मोदी
पक्षप्रवेशानंतर माजी नगरसेवक सुनील मोदी आपल्या भाषणात म्हणाले, मी कुठल्याही पदाच्या अपेक्षेने शिवसेनेत प्रवेश केलेला नाही. संघटना मजबूत करण्यासाठी केला आहे. यापुढे भाजपमधून अनेक कार्यकर्ते सेनेत दाखल होतील, असे सूतोवाचही त्यांनी केले.
सुनील मोदी शिवसेनेत
या कार्यक्रमात माजी नगरसेवक सुनील मोदी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी निवेदकाने ‘जसे भाजपमध्ये पंतप्रधान मोदी आहेत, तसेच ब्रेन, बुद्धिवादी नेते म्हणून सुनील मोदी हेही आमच्यात ‘मोदी’ म्हणूनच आहेत, असे सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

Web Title:  Chandrakant Dada has so much money from where?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.