नेतृत्व चंद्रकांतदादांचे पण कोल्हापुरात भाजपचे कारभारी धनंजय महाडिकच, एकजुटीचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 02:17 PM2023-03-24T14:17:46+5:302023-03-24T14:18:21+5:30
जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्याबाबतीत महाडिक यांच्या शब्दाला वजन
समीर देशपांडे
कोल्हापूर : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात खासदार धनंजय महाडिक हेच भाजपचे कारभारी असतील असे स्पष्ट संकेत आता मिळत आहेत. त्यामुळे यापुढच्या काळात पाटील समर्थक आणि महाडिक गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात संतुलन राखण्याचे आव्हान मंत्री पाटील आणि महाडिक यांच्यासमोर आहे.
गेल्या लोकसभेला पराभव झाल्यानंतर वर्षभरातच महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि महाडिक हळूहळू पक्षात सक्रिय झाले. परंतु तेव्हा सत्ता नव्हती. त्यामुळे होणाऱ्या आंदोलनात महाडिक गटाचे कार्यकर्ते अपवादाने दिसायचे. परंतु परिस्थिती बदलत गेली. साखर कारखान्यांबाबत केंद्र शासनाकडे ज्या मागण्या करायच्या असतील, बैठका घ्यायच्या असतील त्याची समन्वयाची जबाबदारी महाडिक यांच्याकडे देण्यात आली. तेव्हापासून महाडिक यांचा पक्षातील दबदबा वाढला. यातूनच आता भाजपचे जुने पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.
दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीतही याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. एकीकडे पक्षात नवीन येणाऱ्यांमुळे जुने अडगळीत पडणार नाहीत याची काळजी घ्या, असे आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. त्यामुळेच मंत्री पाटील व खासदार महाडिक यांचे नेतृत्व मानणारे दोन गट अशी स्थिती झाली आहे. मुख्यत: आंदोलनात व साखर वाटपात सगळीकडे चंद्रकांतदादा गट सक्रिय असतो. पक्षाचा एखादा कार्यक्रम आहे व जिथे स्वत: महाडिक उपस्थित आहेत, तिथेच त्यांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती असते असेही चित्र अनेकदा दिसले आहे.
मंत्री पाटील यांना मानणाऱ्या गटाकडे लोकबळ मर्यादित आहे. त्यामुळे पक्षाचा एखादा मोठा कार्यक्रम यशस्वी करायचा असल्यास त्यासाठी महाडिक गटाची ताकद लागते ही पण वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भाजप म्हणूनच या दोन्ही नेत्यांना मानणारे कार्यकर्ते एकजूट झाल्यास पक्षाची ताकद वाढणार आहे. सध्या तसे होताना दिसत नाही म्हणूनच एका जिल्ह्यातील पक्षांतर्गत तक्रारी थेट प्रदेशाध्यक्षांपर्यंत गेल्या आहेत. तोंडावर लोकसभा, विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षात झालेली ही विभागणी अडचणी वाढवणारी ठरू शकते.
आवाज कुणाचा...
जर धनंजय महाडिक कोल्हापुरात नसतील तर अरूंधती महाडिक, त्यांची तिन्ही मुले, अमल महाडिक, शौमिका महाडिक, सत्यजित कदम आणि त्यांच्यासोबतची आजी, माजी नगरसेवकांची फौज सक्रिय असते त्यामुळे जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्याबाबतीत महाडिक यांच्या शब्दाला वजन राहणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.